
कोल्हापूर : भारतात तलावाच्या काठावर बांधलेले राजवाडे खूप कमी आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या काठावर बांधलेला शालिनी पॅलेस हा ‘लेक व्ह्यू पॅलेस’ म्हणून वैशिष्ट्यपूर्ण असा वारसा आहे. अगदी अलीकडच्या काळात मध्ययुगीन पद्धतीचा अवलंब करून बांधण्यात आलेली ही वास्तू आहे. १९३१ ते १९३४ दरम्यान आठ लाख रुपये खर्च करून ही वास्तू बांधण्यात आली. छत्रपतींच्या कन्या श्रीमंत शालिनीराजे यांचे नाव त्याला देण्यात आले.
रंकाळा तलावाच्या पश्चिम दिशेला पूर्वेकडे तोंड करून हा राजवाडा बांधला आहे. समोर असलेल्या तलावाचा संगमरवरी फरशा बसवलेला पांढरा घाट, समोरचा बगीचा, कारंजा हा राजवाड्याचे सौंदर्य खुलवणारा आहे. आयताकृती आकाराच्या इमारतीवर चारही कोपऱ्यांवर चार घुमटाकार मनोरे आहेत. इमारतीच्या दर्शनी भागात एक चौकोनी मनोरा असून तो इतर मनोऱ्यांपेक्षा उंच आहे. त्याचा वरचा भाग बहुकोनी असून स्तंभांच्या आधारावर मोठा घुमट आहे. मोठे घड्याळ याच मनोऱ्यात आहे.
प्रवेशद्बारावरील मंडप कोरीव नक्षीकामाच्या सजावटीने देखणा ठरला आहे. दोन्ही बाजूला कमानीच्या मागे व्हरांडा, समोर अभ्यागत दालन, दोन्ही बाजूला दोन प्रशस्त दालने, मोठ्या आकाराच्या खोल्या, मधल्या दालनातून वर जाणारा जिना, वरच्या मजल्यावर खाली असलेल्या व्हरांड्याची रचना, त्यामागे दालने, दोन्ही बाजूच्या कोपऱ्यावर प्रशस्त शाही दालने, भिंतीवर आणि खिडक्या, दरवाजा सभोवती, छताला वेलबुट्टी असलेले उठावाचे सोनेरी रंगातील नक्षीकाम, दरवाजावरील नक्षीकाम हे पाहताना राजवैभव नजरेस पडते. लांब व्हरांडा कमानीच्या संगतवार रचनेतून प्रकाश आणि छायेत अनुभवताना डोळे दिपतात.
तरच वारसा जपला जाईल...
कोणत्याही ठिकाणी उभे राहून तलाव पाहताना नजर रेंगाळते. पहाटे, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री, सूर्योदय आणि चंद्रोदय, पौर्णिमेच्या चांदण्याचा या राजवाड्यात उभे राहून एकदा तरी अनुभव घ्यावा, अशी ही वास्तू आहे. पूर्वी तलावात दिसणारे प्रतिबिंब आणि राजवाड्याच्या मागे होणारा सूर्यास्त ही पर्वणी होती. आता ती क्षितिजरेषा गमावली आहे. काही काळ शहाजी महाविद्यालय या वास्तूमध्ये सुरू होते. नंतरच्या काळात हॉटेल सुरू झाले. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण इथे झाले.
कोल्हापूरकरांना आणि पर्यटकांना मोहिनी घालणारी ही वास्तू आहे. उत्तम वारसा असलेली ही वास्तू वापराविना पडून आहे. निःशब्द अवस्थेत सारं शांतपणे सोसत एकाकी पडलेले हे वैभव अजून शंभरीदेखील न गाठता निपचित आहे. केवळ अर्थ शोधत वास्तू दुर्लक्षित व्हावी, ही अशोभनीय बाब आहे. वापर नसेल तर देखभालीकडे दुर्लक्ष होण्याचा धोका आहे. अजूनही वेळ गेली नाही. तेव्हा सामंजस्याने योग्य पुढाकार घेऊन ही वास्तू लवकरात लवकर वापरात आणली तर हा वारसा जपला जाईल.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.