esakal | आभाळभर पसरलेले चांदणं अनुभवायला कोल्हापूरात आहे 'ही' टेकडी
sakal

बोलून बातमी शोधा

heritage of kolhapur tramboli temple information by uday gaikwad

आषाढ महिन्यातील मंगळवार, शुक्रवारी पंचगंगा नदीचे पाणी व नैवेद्य वाजत गाजत नेवून वाहण्याची परंपरा आहे.

आभाळभर पसरलेले चांदणं अनुभवायला कोल्हापूरात आहे 'ही' टेकडी

sakal_logo
By
उदय गायकवाड

कोल्हापूर :‘करवीर माहात्म्य’मध्ये महत्त्वाचे स्थान असलेली त्रंबोलीदेवी कोल्हापूरकरांच्या लोकजीवनात महत्त्वाचे स्थान मिळवणारी ठरली. टेंब म्हणजे टेकडी अशा अर्थाने  टेंबावर असलेली आई असे बोली भाषेत तयार झालेले नावं असावे. नवरात्रीतील पंचमीला मोठी यात्रा भरते, आषाढ महिन्यात मंगळवार, शुक्रवारी इथे लोक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात, असे हे ठिकाण पूर्वेकडील गावाबाहेरच्या टेकडीवर आहे.
 

आषाढ महिन्यातील मंगळवार, शुक्रवारी पंचगंगा नदीचे पाणी व नैवेद्य वाजत गाजत नेवून वाहण्याची परंपरा आहे. नवरात्र उत्सवात पंचमी दिवशी अंबाबाई त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी जाते. यावेळी तुळजाभवानी व इतर पालख्या मिरवणुकीने जातात. कोहळा फोडण्याची (कुष्मांड भेद) करण्याचा सोहळा युवराजांच्या हस्ते कुमारी पूजेनंतर पार पडतो. या निमित्ताने दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक गर्दी करतात. 
इथे यात्रा भरते.


गर्भगृह आणि त्यासमोर दगडी खांबावर उभारलेला मंडप, गर्भगृहावर शिखर, समोर दगडी चौथरा असं अगदी साधं मंदिर पूर्वाभिमुख आहे. दीपमाळा आणि इतर दोन मंदिरे आणि सभोवती पांढऱ्या चाफ्याची झाडे आहेत. तेथून उत्तरेला मरगाईचे मंदिर, दीपमाळा, मारुतीचे मंदिर आहे. मरगाई ही गावावर रोगराईचे संकट रोखणारी देवता म्हणून तिची आराधना केली जाते. शेजारच्या टेकडीवर क्षय रोगासारख्या रुग्णाच्या स्वतंत्र व्यवस्था करणारे सर क्‍लॉड हॉस्पिटल होते. या ठिकाणी राजाराम रायफ्ल्स किंवा सध्याचे टी. ए. बटालियनचे मुख्यालय आहे. उत्तरेकडील टेकडीवर बालींगा पंप स्टेशनवरून पंचगंगेचे पाणी फिल्टर करून आणले आहे. ते साठवणूक करणारा विक्रम सिन्हा रिझरव्हायर आहे. एक लाख पंच्याहत्तर हजार गॅलनपाणी क्षमतेची ही टाकी १९२८ मध्ये चार लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली.  

  
या टेकडीच्या पूर्वेला क्षितिजापर्यंतजवळ टेकडी नाही. सूर्योदय पहाण्यासाठी अशी सुंदर जागा नाही. टेकड्यांचे अस्तित्व संपत असताना आज वारसा म्हणून ही टेकडी जपण्याची संधी आहे.
आज भक्त निवास, शाळा, दुकान गाळे, अनाठायी बांधकामे, फेरीवाले हे उत्तम नैसर्गिक आणि धार्मिक वारसा असलेल्या ठिकाणाला अनुरूप ठरत नाहीत. फक्त मंदिर आणि टेकडी इतकचं त्यांचं अस्तित्व राखलं तर वारसा म्हणून ते अधोरेखित होईल.

हेही वाचा- सगळं आहे ! फक्त पोरगी मिळाली पाहिजे ;  व्यथा तिशी ओलांडलेल्या मुलांची -


‘करवीर माहात्म्य’मध्ये उल्लेख
कौंडीण्य मुनींनी त्याच्या पत्नी सत्यवतीला उशाप दिल्यानंतर तिचा जन्म भार्गव व विशालाक्षी यांच्या पोटी झाला. ही चतुर्भूज, दिव्य लक्षणयुक्त कन्या त्यांनी महालक्ष्मीला अर्पण केली. करवीर नगरीतील मल्लालय तिर्थातील कमळाची फुले दैत्य चोरून नेत. त्यांचे रक्षण करण्यासाठी देवीने या कन्येची नेमणूक केली. कमळ चोरणाऱ्या दैत्यांचा  पाण्यात वध या कन्येने केला. पाण्यात बुडून पराक्रम करणारी म्हणून तू अंबू असून, आजपासून तुझे नाव त्र्यंबुली असे देवी म्हणाली, असा उल्लेख ‘करवीर माहात्म्य’मध्ये आहे.

चांदणं अनुभवायला उत्तम जागा 
चैत्रात चाफा फुलला की, पौर्णिमेच्या चांदण्यात त्याचं सौंदर्य आणि त्या प्रकाशात मंदिर हा नजराणा अप्रतिम असतो. अमावस्येला आभाळभर पसरलेले चांदणं अनुभवायला ही टेकडी उत्तम जागा आहे.

संपादन- अर्चना बनगे

loading image