Aditya Temple : शिलाहार कालखंडात रूढ झाले 'ब्रह्मपुरी' हे नाव; आदित्य मंदिराला आहे अनोखा इतिहास

आदित्य मंदिराला ब्रह्मा आणि विष्णू यांच्या मंदिरांची जोड देऊन त्याचे त्रिकूट प्रासादामध्ये रूपांतर केले गेले.
Aditya Temple Brahmapuri
Aditya Temple Brahmapuriesakal
Summary

आजच्या ब्रह्मपुरी भागाचे ब्रह्मपुरी हे नाव शिलाहार कालखंडात रूढ झाले.

-डॉ. योगेश प्रभुदेसाई

Aditya Temple Brahmapuri : पूर्व-मध्ययुगीन कालखंडात मंदिरे बांधणे हे जसे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे योगदान होते तसेच अस्तित्वात असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे राजकीय आणि सामाजिक योगदान होते. काही मंदिरे ही केवळ बांधून काढली जात आणि त्यांचा कार्यकलाप अविरत चालू राहावा यासाठी मंदिर व्यवस्थापनेला काही जमिनी दान दिल्या जात असत.

काही मंदिरे बांधून काढल्यावर त्यांच्या डागडुजीची सोयही जमिनीच्या दानाबरोबर करून दिली जात असे आणि तसा स्पष्ट उल्लेख दानलेखांत केलेला असे. ब्रह्मपुरी खेट (खेडे) मधील आदित्य मंदिर (Aditya Temple) हे असेच जीर्णोद्धारित मंदिर. लेखाजोखा ठेवणाऱ्या मैलपेयनामक मंत्र्याच्या विनंतीवरून गंडरादित्य शिलाहाराने ब्रह्मपुरीमधील (Brahmapuri) आदित्य मंदिराकडे लक्ष घातले. या मंदिराचा आधीही जीर्णोद्धार झाला होता; पण पुनः काही (बहुधा नैसर्गिक) कारणामुळे हे मंदिर ढासळले होते अथवा त्याला क्षती पोहोचली होती.

Aditya Temple Brahmapuri
Shriram Mandir : निपाणीतील श्रीराम मंदिर उडवून देण्याची धमकी; दोन निनावी पत्रांनी खळबळ, मंदिरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

त्यामुळे हे मंदिर पुन्हा बांधून काढले गेलेच; पण त्याचबरोबर आदित्य मंदिराला ब्रह्मा आणि विष्णू यांच्या मंदिरांची जोड देऊन त्याचे त्रिकूट प्रासादामध्ये रूपांतर केले गेले वा त्याचबरोबर मंदिराच्या कार्यकलापासाठी आषाढ मासातील दक्षिणायन संक्रांतीच्या दिवशी मिरींजे देशातील, कोडवल्ली खंपणातील (आजच्या परिभाषेत जिल्हा) कोनिंजवाड या गावातील सहा एकर जमीन तेथील ग्रामाधिकाऱ्यांकडून विकत घेऊन सर्व करमुक्त करून ती दान दिली. पुन्हा त्याच गावातून ब्रह्मपुरीतील बारा (बहुधा कराडे) ब्राह्मणांना अष्टविध भोगांसाठी (आठ प्रकारच्या सुखसुविधा) बारा एकर जमीन दान केली आणि वर तत्कालीन मापदंडाच्या बहात्तर चौरस क्षेत्रफळ जमिनीचा तुकडादेखील दान केला.

यातील काही ब्राह्मण (चतुर्वेदी, भट्टोपाध्याय, भट्ट, क्रमविद) हे निमंत्रित होते, असा अंदाज येतो. कारण या ब्राह्मणांना पुन्हा प्रत्येकी दीड-दीड एकर जमिनी दान दिल्याचा उल्लेख आहे. कदाचित ब्रह्मपुरीतील शिक्षण केन्द्र विकास करण्याच्या दृष्टीने बहात्तर चौरस क्षेत्रफळ जमिनीचा तुकडा दान करण्यात आला असावा, जेणेकरून त्या जागी विद्यार्थ्यांची शिक्षणाची आणि राहण्याची सोय व्हावी. तसेच आदित्य मंदिराच्या त्रिकूट प्रासाद रूपांतरणावरूनदेखील हा अंदाज बांधता येतो की, इथे शिक्षण केन्द्राचा विकास होऊ घातला होता. शिवाय या बारा ब्राह्मणांच्या नित्यभोजन सुविधेसाठी सहा एकर जमीन दान दिली. मंदिराला भविष्यात कुठे कसली क्षती पोहोचली तर त्याच्या जीर्णोद्धारासाठी दीड एकर जमीन दिली.

Aditya Temple Brahmapuri
'कागल' ठरणार लोकसभेचा केंद्रबिंदू; समरजित घाटगेंना भाजपची उमेदवारी शक्य, शिवसेनेकडून मंडलिकांसाठी दावा

ही दिलेली सर्व दाने ब्रह्मपुरीच्या महाजनांनी (ब्राह्मणांनी) सांभाळायची आहेत, अशीही राजाज्ञा कोरीव लेखात दिसते. या बारा ब्राह्मणांच्या नित्यभोजनात काय काय असावे हेदेखील कोरीव लेखात नमूद केलेले आहे. त्यांच्या नित्यभोजनात पांढरा भात, तुरीचे वरण, आमटी/सार, तूप, ताक, चार प्रकारच्या भाज्या आणि भोजनाअंती विडा अशा पदार्थांचा स्पष्ट उल्लेख आहे. या कोरीव लेखावरून हे चित्र स्पष्ट होते की, आजच्या ब्रह्मपुरी भागाचे ब्रह्मपुरी हे नाव शिलाहार कालखंडात रूढ झाले. कारण तिथे ब्राह्मणांना वसवून शिक्षण केन्द्र सुरू केलेले होते. ब्राह्मणांची वस्ती ती ब्रह्मपुरी; पण तत्पूर्वी त्या भागाचे नाव काय होते हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com