
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांना शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, खासदारांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे.
एवढा मोठा त्याग करूनही पक्षाला माझी राज्यसभेला आठवण झाली नाही : क्षीरसागर
कोल्हापूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी शिवसेनेतील (Shiv Sena) आत्तापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी ठरली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) मिळून राज्यात सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांना शिवसेनेचे नगरसेवक, नेते, पदाधिकारी, खासदार यांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. असं असताना आता शिंदेंच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांची खदखद आता बाहेर पडू लागलीय. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर लागलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत मी एवढा मोठा त्याग केला. मात्र, पक्षाला माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, अशी खदखद राजेश क्षीरसागर यांनी जाहीरपणे बोलून दाखविलीय.
हेही वाचा: 'शशिकांत शिंदे भाजपात प्रवेश करत असतील, तर त्यांचं मी घट्ट मिठीत घेऊन स्वागत करेन'
या विधानामुळं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला कोल्हापूरातूनच क्षीरसागर यांच्याकडून विरोध होता हे आता स्पष्ट झालंय. शिवसेनेमध्ये बंड करत एकनाथ शिंदेंनी आमदार आणि खासदार फोडले याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातही झाला असून कोल्हापूर शिवसेनेमध्ये ही मोठी खिंडार पडलीय.
हेही वाचा: उद्धव ठाकरेंनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये; बंडखोर आमदार देसाईंचं आवाहन
कोल्हापूरचे विद्यमान दोन खासदार आणि आमदार यांच्यासोबत माजी आमदार राजेश क्षीरसागर हे शिंदे गटाला जावून मिळाले. यावेळी आपण हिंदुत्वाच्या मुद्यांवर भाजप सोबत गेलो असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता हळूहळू सर्वांची खरी खदखद समोर येत असून माजी आमदार क्षीरसागर यांनी अखेर त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढलीय. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लागली आणि तिथं मी जिंकून आलो असतो. मात्र, एवढं असतानाही मातोश्रीचा आदेश म्हणून मी पोटनिवडणूक लढवली नाही. एवढा मोठा त्याग मी केला. मात्र, तरीही राज्यसभेच्या निवडणुकी वेळी माझा विचार न करता पक्षानं संजय पवार यांना उमेदवारी दिली, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केलीय.
Web Title: I Made A Big Sacrifice In The Kolhapur North By Election Rajesh Kshirsagar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..