esakal | विद्यार्थ्यांच्या कलाकारीतून साकारल्या बाप्पांच्या मूर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड: विद्यार्थ्यांच्या कलाकारीतून साकारल्या बाप्पांच्या मूर्ती

चंदगड: विद्यार्थ्यांच्या कलाकारीतून साकारल्या बाप्पांच्या मूर्ती

sakal_logo
By
सुनिल कोंडूसकर

चंदगड: चंदगड येथील द न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आर. आय. पाटील यांनी विद्यार्थ्यांपुढे ‘इको फ्रेंडली बाप्पा’ या उपक्रमाची संकल्पना मांडली आणि कलाकारीला उधान आले. विविध नैसर्गिक साहित्य आणि रंगांचा वापर करून छोट्या छोट्या आकाराच्या तब्बल ११० आकर्षक गणेश मूर्ती आकाराला आल्या. उपशिक्षणाधिकारी बी. डी. टोणपे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.

हेही वाचा: इचलकरंजी: ‘मोरया’च्या जयघोषात बाप्पांचे आगमन

अलिकडच्या काळात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ हेतू मागे पडला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, त्यांना फासलेले रासायनिक रंग यामुळे जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याला पर्याय म्हणून पर्यावरण पूरक मूर्ती तयार करणे गरजेचे आहे. हा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्याचा हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी तो अनुभवला.

माती, शेडू, कागदी लगदा, पीठ, पानेफुले व कडधान्यांपासून विद्यार्थ्यांनी आकर्षक मूर्त्या बनविल्या. रासायनिक रंगाऐवजी हळद, मुलतानी माती, गोरूचा आदी नैसर्गिक रंगाचा वापर केला. या मूर्तींचे शाळेत प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचे उद्‍घाटन माध्यमिक उपशिक्षणाधिकारी बी. डी. टोणपे यांच्या हस्ते झाले.

त्यांनी विद्यार्थ्याना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्व सांगितले. या उपक्रमासाठी आर. पी. पाटील, बी. आर. चिगरे, व्ही. के. गावडे, टी. एस. चांदेकर, एम. व्ही. कानूरकर, टी. टी. बेरडे, एस. जी. साबळे, डी. जी. पाटील, एस. जे. शिंदे, टी.व्ही. खंदाळे, विद्या शिंदे, जे.जी. पाटील, वर्षा पाटील यांनी परिश्रम घेतले.

पर्यावरण शिक्षण हा संस्काराचा भाग आहे. केवळ पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करायला लावली तर विद्यार्थ्यांना हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. याच हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. - आर. आय. पाटील, मुख्याध्यापक

loading image
go to top