
कोल्हापूर : ‘सावित्री-जोती आभाळाएवढी माणसं’ मालिकेची उपेक्षाच!
कोल्हापूर : समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि समाजिक न्याय या वैश्विक मूल्यांची शिकवण देणारे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘सावित्री ज्योती : आभाळाएवढी माणसं’ या मालिकेच्या वाट्याला उपेक्षाच आली. कोरोनामुळे प्रेक्षकांचा प्राधान्यक्रम बदलला आणि टीआरपीअभावी गेल्यावर्षी २६ डिसेंबरला ही मालिका अर्ध्यावर बंद झाली. मालिका पुन्हा सुरू करण्यासाठी अर्थसाह्य देण्याबाबत सरकार दरबारी सकारात्मक चर्चा झाली; मात्र पुढे काहीच निर्णय झाला नाही. ही मालिका पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य हे एकप्रकारे वैचारिक लसीकरण आहे. सध्याच्या चंगळवादी, भांडवलशाहीला प्राधान्य देणाऱ्या युगात जातीय, धार्मिक अस्मिता टोकदार बनत चालल्या आहेत. अशा स्थितीत हे वैचारिक लसीकरणच प्रभावी ठरू शकते. फुले दाम्पत्याची ‘जडणघडण व क्रांतिकारी कार्यावर प्रकाश टाकणारी ‘सावित्री ज्योती’ ही मालिका एका मराठी वाहिनीवर ६ जानेवारी २०२० रोजी सुरू झाली.
हेही वाचा: Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू
फुले दाम्पत्याचे आदर्शवत कार्य आणि प्रेरणादायी विचार, कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या आवडीची ठरली. मात्र कोरोनाच्या लाटेमुळे लोकांचे प्राधान्यक्रम बदलले आणि मालिका बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर मालिका सुरू करण्याबाबत सरकारकडून काही अर्थसाहाय्य मिळेल का यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अर्थसाह्य देण्याबाबत निवेदन दिले.
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना सांस्कृतिक विभागातर्फे अर्थसहाय्य देण्याबाबत पत्रही पाठविले. मात्र त्यावर पुढे काही झाले नाही. वस्तूतः सामाजिक सलोखा, एकात्मता टिकविण्यासाठी अशा प्रबोधनात्मक मालिका सरकारला फायदेशीर ठरतात. सांस्कृतिक विभाग दरवर्षी साहित्य निर्मितीसाठी पुरस्कार अथवा अर्थसहाय्याच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करीत असतो.
अशावेळी सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण लोककल्याणाचा विचार मांडणाऱ्या ‘सावित्री-जोती’सारख्या मालिकांना अर्थसाहाय्य करणे हे साहित्य निर्मिती अथवा साहित्य संमेलनाला मदत करण्याइतकेच मोलाचे ठरणार आहे. फक्त त्यासाठी सरकारची इच्छाशक्ती तशी असणे आवश्यक आहे.
"महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई यांची जडणघडण आणि क्रांतिकारी कार्याची प्रभावी मांडणी ‘सावित्री-जोती’मालिकेतून केली. ही मालिका आदिवासी, दलित, ओबीसी, भटके-विमुक्तांसह सर्वच वर्गाला उन्नतीची प्रेरणा देणारी आहे. या मालिकेचे सामाजिक मोल मोठे आहे. ही मालिका पुन्हा सुरू करावी, अशी मागणी वारंवार होत आहे. मालिका सुरू होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अर्थसाहाय्य करणे अपेक्षित होते, मात्र राज्य सरकार यात कमी पडले."
-प्रा. हरी नरके, ज्येष्ठ विचारवंत, संशोधक
Web Title: Ignoring The Series Savitri Joti Abhalaevadhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..