esakal | व्यापारी बैठकीतील निर्णयांचा अंमल
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : व्यापारी बैठकीतील निर्णयांचा अंमल

कोल्हापूर : व्यापारी बैठकीतील निर्णयांचा अंमल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर ते पापाची तिकटी, महाद्वार रोड व्यापाऱ्यांसह फेरीवाल्यांसाठी शुक्रवारपासूनच खुला आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार पादचाऱ्यांसाठी उड्डाणपूल रात्रीत उभा केला आहे. कालच्या बैठकीतील सर्व निर्णयांचा अंमल सुरू झाला आहे. मुखदर्शनासाठी गर्दी असल्यामुळेच बिनखांबी मंदिर ते अंबाबाई मंदिर परिसरातील बॅरिकेड महत्त्वाचे आहेत. हा रस्ता केवळ रुग्णवाहिका, अग्निशमन बंबाव्यतिरिक्त कोणालाही खुला करता येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिली.

बॅरिकेड आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘‘फेरीवाले, व्यापारी यांनी बॅरिकेडबाबत प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यानंतर काल आमदार चंद्रकांत जाधव, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह व्यापाऱ्यांची बैठक झाली. त्यात गुजरी येथे पूल बनविण्याचा निर्णय झाला. तो पूल एका रात्रीत उभा केला आहे.

सर्व बॅरिकेड नागरिकांना पायी जाण्यासाठी खुले आहेत. दोन्ही दिशेला दोन्ही बाजूने लोकांना पायी जाणे शक्य आहे. बिनखांबी ते अंबाबाई मंदिर या ठिकाणी कोणत्याही फेरीवाल्यांना बसविता येणार नाही. कारण महाद्वारवरील मुखदर्शनाची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याची आवश्‍यकता आहे. तसेच अग्निशमन आणि रुग्णवाहिकेसाठी दुसरी बाजू मोकळी ठेवावी लागते.

महाद्वार ते पापाची तिकटी या सर्व ठिकाणी फेरीवाले बसलेले आहेत. दरवर्षी ज्या ज्या ठिकाणी बॅरिकेड लावतो, त्याच ठिकाणीच यावेळीही लावलेले आहेत. काल बैठकीच्या ठिकाणावरूनच पोलिसांनी पायी जाण्यासाठी बॅरिकेड खुले करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्याचा अंमल सुरू झाला आहे.

हेही वाचा: सामान्यांच्या ताटातून भाजी गायब

पहिल्या दिवशी साडेसहाशे भाविक प्रत्येक तासाला होते. दुसऱ्या दिवशी ९०० होते. आज तिसऱ्या दिवशी १२०० होते. उद्यापासून ते दीड हजार होणार आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवायचे झाले तर साधारण ९ हजार फुटांचे बॅरिकेड बनवावे लागेल. त्यामुळे नगारखान्याच्या (भवानी मंडप) आतच हे शक्य नाही. म्हणून शिवाजी चौकातूनच रांग सुरू केली आहे.’’

काहींच्या वेळेत कमी-जास्त होते. त्यामुळे एकाच वेळी अधिक संख्या होते. म्हणूनच ही रांग नेहमीप्रमाणेच ठेवल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

"शिवाजी चौक ते भवानी मंडप या रस्त्यावर मॅटिंग टाकले आहे. उन्हाचा आणि पावसाचा त्रास होऊ नये, म्‍हणून तेथे मंडप उभारणीच्या सूचना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांनी इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर्शन रांगेत यूज ॲण्ड थ्रो ग्लासमध्ये पाण्याची व्‍यवस्था उपलब्ध केली जाईल."

- राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

व्यापाऱ्यांवर ग्राहक शोधण्याची वेळ

अंबाबाई मंदिर परिसरातील विक्रेते, फेरीवाले, दुकानदारांच्या संतप्त प्रतिक्रिया

"व्यवसायात आमचे कुटुंब ४० वर्षे आहे; पण ही स्थिती कधी अनुभवली नव्हती. दोन वर्षांपूर्वी दिवसभरात दोन ते तीन नारळाची पोती संपायची. आता दिवसभरात एकही संपत नाही. टॉयलेट व बाथरूमला जाण्याची सोय परिसरात नाही. विद्यापीठ हायस्कूलकडे जाता येत होते. तोच मार्ग बंद आहे."

- आकाश महेंद्रकर, पूजा साहित्य विक्रेते

"मंदिराच्या तिन्ही दरवाजांतून भाविकांना या आधी आत जाता येत होते; मात्र बॅरिकेड लावल्यामुळे जायचे कुठून, याचा शोध घ्यावा लागतो. नवरात्रोत्सवात नागरिकांसह परराज्यातील भाविकांचा खरेदीसाठी उत्साह असायचा. तो यंदा दिसत नाही. विक्रीत ७० टक्के घट झाली आहे.'

- किरण गवळी, अध्यक्ष, महालक्ष्मी फेरीवाला संघटना

"भाविकांपेक्षा पोलिसांचीच गर्दी, असे मंदिर परिसरातील चित्र आहे. कोरोना काळात दुकाने बंद होती. व्यवसाय तोट्यात होता. कोरोनाचा कहर कमी झाल्याने सर्व काही पूर्वपदावर येईल, अशी आशा होती. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थीवर्गाकडून स्टेशनरीची खरेदी केली जाते, तीही आता होत नाही."

- संजय शहा, पुष्पमाला ग्रंथ भांडार

"नवरात्रोत्सवात येणारा भाविक देवीसाठी दागिने अर्पण करतो. गुजरीतील सराफ व्यावसायिकांकडे तो दागिन्यांची खरेदी करतो. त्याच भाविकाला मंदिरात नेमके यायचे कोठून, ते माहीत नाही. पार्किंग करायचे कोठे, हेही समजत नाही. जो रस्ता सकाळी वाहतुकीसाठी खुला असतो, तो दुपारी अचानक बंद होतो."

- सम्राट पोवार, सराफ व्यावसायिक

"कोरोनामुळे एक तर दीड वर्ष रोजगार बुडाला. आता मंदिर सुरू झाल्यानंतर किमान काहीतरी आर्थिक बळ मिळेल, असे वाटत असतानाच प्रशासनाने जुलमी नियम केले आहेत. प्रशासनाला दुकानदारांना भिकेला लावायचे आहे का?"

- दिनेश ओसवाल

"भवानी मंडप परिसरातील औषध दुकानात औषधे नेण्यासाठीही ग्राहकांना सोडले जात नाही. नियम असायलाच हवेत; पण नियमांचा अट्टहास कशासाठी? कुलूप लावून घरी जाऊन बसायचे का?"

- चंद्रकांत इंगळे, औषध दुकानदार

"कोरोना संकटामुळे नवरात्रोत्सवात भाविकांची यंदा अपेक्षित गर्दी होण्याची शक्यता नव्हती. तरीही रस्ते बंद केले. भाऊसिंगजी रोड, गुजरीतील व्यवसाय ठप्प झाले आहेत. पण वीज बिल, कर्जावरील व्याज थांबलेले नाही. आम्हाला विचारात घेणार नसाल तर नऊ दिवसांचे वीज बिल माफ करा."

- अभिषेक पुरोहित, औषध दुकानदार

"महापूर, कोरोनामुळे चप्पल विक्री ठप्प होती. नवरात्रोत्सवात अपेक्षित व्यवसाय होईल, असे वाटत होते. ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांना मास्क, सॅनिटायझरचे बंधन घालून प्रवेश देता आला असता. पण रस्ते बंद करण्याच्या नियोजनाचा फटका बसला आहे."

- वंदना व्हटकर, चप्पल दुकान व्यावसायिक

"मंदिर परिसरातील व्यावसायिकांना उत्सवकाळात आवश्यक पासच्या संदर्भात माहितीच दिली नाही. व्यावसायिकांबरोबर येथील रहिवाशांनाही त्याचा दररोज त्रास सहन करावा लागतो आहे. रस्ते बंद केल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेक व्यावसायिकांनी व्यवसायच बंद ठेवले आहेत."

- जितेंद्र झाड, खेळणी व्यावसायिक

"मंदिराकडे येणारा आणि मंदिरातून बाहेर जाण्याचा रस्ताच सर्वसामान्यांना कळत नाही. दिवसभर रस्त्याकडेला फुले घेऊन तासन्‌ तास ग्राहकाची वाट बघत बसायचे. ग्राहकाची वाट पाहून कुजलेली फुले टाकून द्यायची."

- महादेवी रुडनावर, फूल विक्रेत्या

"जनावरांसाठी लागणारी औषधे आम्ही किरकोळ व होलसेल विक्री करतो. विविध भागातील विक्रेते आमच्याकडून त्यांची खरेदी करतात. त्यांची वाहनेच आमच्या मेडिकलपर्यंत येणे अशक्य झाले आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांनाही दुकानात येण्यासाठी पासविना अडचणी येत आहेत."

- इंद्रजित मोहिते, पशुवैद्यकीय औषध विक्रेते

"नवरात्रोत्सवात दररोज सात ते आठ किलोचे गजरे विक्री व्हायचे. रस्ते बंद असल्याने एक किलो गजऱ्यांचीच विक्री होते. दिवसाकाठी मंदिर परिसरातील २२ विक्रेत्यांना शंभर ते सव्वाशे रुपये हाती पडतात. दुचाकी मंदिर परिसरात येऊ शकली तरच ग्राहक येईल. याचा विचार व्हावा."

- अतुल निकम, गजरा विक्रेते

"छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगारखानापर्यंत बॅरिकेड्स लावली आहेत. परिणामी रस्ता क्रॉस करून दुकानात येण्यास भाविकांना अडचण निर्माण झाली आहे. ऑक्टोबर हीटमुळे ग्राहक शीतपेय प्यायला येतात. त्यांची गर्दी रोडावली आहे."

- अजिंक्य शिंदे, कोल्ड्रिंक्स व्यावसायिक

loading image
go to top