esakal | इचलकरंजीमध्ये कोरोना चाचणींची संख्या चौपट वाढली

बोलून बातमी शोधा

Increase In Corona Test In Ichalkaranji Kolhapur Marathi News

कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोना चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत सध्या कोरोना चाचणीसाठी नागरिकांच्या आयजीएम रूग्णालयात रांगा लागत आहेत.

इचलकरंजीमध्ये कोरोना चाचणींची संख्या चौपट वाढली
sakal_logo
By
ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोना चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत सध्या कोरोना चाचणीसाठी नागरिकांच्या आयजीएम रूग्णालयात रांगा लागत आहेत. आयजीएमसह खासगी लॅबमध्ये दैनंदिन कोरोना चाचणीत चौपट वाढ झाली आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधीत रूग्णांचे प्रमाणही 15 टक्‍क्‍यांवर आले आहे. मात्र प्रतिबंधात्मक कोरोना चाचणीची संख्या अधिक असल्याने उपचारात्मक नागरिकांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 

शहरात बाधीत रूग्णांची संख्या दिडशे पार गेली आहे. त्यामुळे संसर्गाचा कहर वाढल्याने कोरोना चाचणीसाठी नागरिकांची दैनंदिन संख्याही वाढली आहे. काही खासगी आस्थापनाच्या ठिकाणी कोरोना चाचणी बंधनकारक केल्याने तेथील कामगार आयजीएममध्ये गर्दी करत आहेत. बाधीत रूग्णाच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत प्रतिबंधात्मक कोरोना चाचणीचे प्रमाण अधिक आहे. रूग्णालयात उपचारात्मक रूग्णांना कोरोना चाचणीसाठी प्रथम पसंती असूनही प्रतिबंधात्मक चाचणीसाठी नागरिक येतच आहेत. यामुळे रूग्णालय प्रशासनाचा गोंधळ वाढत आहे. आयजीएम रूग्णालयात आता प्रतिबंधात्मक व उपचारात्मक कोरोना चाचणीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याची गरज आहे. 

आयजीएम रूग्णालयात दैनंदिन दोनशेच्या पुढे अँटीजन आणि 40 ते 45 आरटीपीसीआर चाचणी होत आहेत. परिणामी चौपट झालेल्या कोरोना चाचण्यामुळे लॅबवर ताण वाढत आहे. नागरिकांना सायंकाळपर्यंत कोरोना अहवालाची प्रतिक्षा करावी लागत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून कोरोना चाचणी करणाऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. शहरात आणखी काही ठिकाणी कोरोना सेंटर उभारून जलदगतीने कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. तरच वाढता संसर्ग वेळीच थोपवता येणार आहे. 

खासगी लॅबचे अहवाल पेडींग 
काही दिवसांपासून वाढत्या संसर्गाबरोबर कोरोना चाचण्यात वाढ झाल्याने शहरातील विविध खासगी लॅबमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. आयजीएमबरोबर अशा खासगी लॅबमध्ये कोरोना चाचण्यांचे दैनंदिन प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खासगी लॅबचा दैनंदिन येणारा अहवाल आता दोन ते तीन दिवसानंतर मिळत आहे. 

दृष्टीक्षेप 
- आयजीएमसह खासगी लॅबमध्ये चाचणी 
- बाधित रुग्णांचे प्रमाण 15 टक्‍यांवर 
- प्रतिबंधात्मक कोरोना चाचणीचे प्रमाण अधिक 
- स्वतंत्र कक्षाची आवश्‍यकता 
- दैनंदिन दोनशेच्या पुढे अँटीजन, 40 ते 45 आरटीपीसीआर चाचणी 

संपादन - सचिन चराटी

kolhapur