अमर यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये आणि तेथून त्यांना पुण्याच्या सैनिक हॉस्पिटलमध्ये नेल्याचे सांगण्यात आले.
गडहिंग्लज : भारतीय सैन्य दलातील जवानाचे (Indian Army Jawan) हात-पाय आणि डोळे बांधून विषारी द्रव पाजण्याची घटना शहरात घडली. अमर भीमगोंडा देसाई (वय ३९, रा. संकेश्वर रोड, गडहिंग्लज) असे जखमी जवानाचे नाव आहे. त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने घडलेल्या या घटनेतील मुख्य संशयित त्याची पत्नी तेजस्विनी अमर देसाई (वय ३३) हिला अटक केली असून, तिचा साथीदार फरार झाला आहे.
पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी सांगितले की, देसाई हे मूळचे नूलचे. पंधरा वर्षांहून अधिक कालावधीपासून ते भारतीय सैन्यदलात आहेत. त्यांना मुलगा व मुलगी आहे. त्यांच्या शिक्षणासाठी पत्नी तेजस्विनीसह ते गडहिंग्लजमधील संकेश्वर रोडवरील पाटणे पाईप कारखान्याच्या मागे बसवेश्वर नगरमध्ये स्वतःच्या बंगल्यात राहतात. अमर सध्या जम्मू येथे कार्यरत आहेत.
ते ३ जुलैला सुटीवर आले असून, १ ऑगस्टला ते पुन्हा सेवेत रूजू होणार होते. गुरुवारी (ता. १८) रात्री साडेनऊच्या सुमारास अमर यांच्या बंगल्यातून मोठ्याने वाचवा...वाचवा असा आवाज आला. यामुळे शेजारच्या नागरिकांनी बंगल्याकडे धाव घेतली. दरवाजाला आतून कडी असल्याने नागरिकांनी दरवाजाचा लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी अमर यांचे हात, पाय व डोळे बांधलेले दिसले. त्यांना रक्ताची उलटी झाली होती. दरम्यान, त्यांच्या घरातील बाथरूममधून एक अनोळखी तरुण पळून जात होता. त्याला अडविण्याचा प्रयत्न करणारे शेजारी खाडे यांच्या डोक्यात कशाने तरी मारून तो पसार झाला.
त्यानंतर नागरिकांनी जखमी अवस्थेतील अमर व खाडे यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अमर यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये आणि तेथून आज त्यांना पुण्याच्या सैनिक हॉस्पिटलमध्ये नेल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी अमर यांच्या फिर्यादीवरून पोलिसात पत्नी व तिच्या अनोळखी साथीदाराविरुद्ध जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाबद्दल गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशाणदार तपास करीत आहेत.
अमर यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने पोलिस कर्मचारी तेथे जाऊन जखमी अमर यांचा जबाब नोंदवला. त्यात ते म्हणतात, गुरुवारी (ता. १८) दिवसभर कामे अटोपून मी रात्री आठच्या सुमारास घरी आलो. जेवून लगेचच बेडरूममध्ये झोपलो. साडेनऊच्या सुमारास मला जाग आली. त्यावेळी माझे हात-पाय बांधल्याचे लक्षात आले. पत्नी तेजस्विनी व तिच्यासोबत असलेला एकजण दोघांनीही माझ्या तोंडात व नाकातून कसले तरी औषध घालत होते. त्याचा मला त्रास होऊ लागल्याने मोठमोठ्याने ओरडलो. त्यानंतर शेजारचे नागरिक आले.
दरम्यान, कोल्हापूरहून फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण केले होते. अमर यांनी केलेल्या रक्ताच्या उलटीचे नमुने या पथकाने घेतले. तसेच घटनेतील संबंधितांसह घटनास्थळावरील काही कपडेही जप्त केले. ठसेही संकलित केले असून, रूममध्ये तणनाशकाची बाटलीही सापडल्याचे सरगर यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.