esakal | ऐन पावसाळ्यात जोतिबा डोंगर तहानला; ग्रामपंचायतची होतेय तारेवरची कसरत
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन पावसाळ्यात जोतिबाचा डोंगर तहानला; डोंगरावर टँकरने पाणी

ऐन पावसाळ्यात जोतिबाचा डोंगर तहानला; डोंगरावर टँकरने पाणी

sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : येथील जोतिबा ग्रुप ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचा थकित वीज बिलापोटी महावितरण कंपनीने गेल्या आठवडयात वीज पुरवठा खंडित केल्यामुळे जोतिबा ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काल पासून टँकरने पाणी आणण्याची वेळ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे जोतिबा ग्रामपंचायतीच्या आर्थिक परिस्थितीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह तीन चार राज्यांचे कुलदैवत असणार्‍या या तीर्थक्षेत्रावर जोतिबा ग्रामपंचायतीचे असणारे तुटपुंजे उत्पन्न आणि व्यवस्थापनासाठी करावा लागणारा भरमसाठ खर्च याचा ताळमेळ घालण्यासाठी जोतिबा ग्रामपंचायतीला नेहमीच तारेवरची कसरत करावी लागते .त्यातच महावितरण कंपनीने 56 लाख रुपये थकीत वीज बिलापोटी जोतिबा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे ग्रामस्थांपुढे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाण्यासाठी आड, विहीरी, तळे, कुंड यांचा आधार घेण्याची वेळ आली आहे.(jyotiba-temple-water-issue-kolhapur-news)

जोतिबा ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत अशी आहे की तिला स्वःताचे गायरान क्षेत्र नाही. या ठिकाणी असणारे गायरान हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मालकीचे आहे. त्यामुळे मिळणारे उत्पन्न देवस्थान समितीच्या तिजोरी जाते. ज्योतिबा ग्रामपंचायतीला फक्त घरफळा आणि पाणीपट्टी या माध्यमातूनच उत्पन्न मिळते. त्यामुळे ज्योतिबा ग्रामपंचायतीच्या मागे पाणीपुरवठा योजनेचा वीज बिलाचा राक्षस उभा आहे. ग्रामपंचायतीला या वीज बिलापोटी दर महिन्याला सुमारे दीड ते दोन लाख रुपये वीजबिल भरावे लागते. म्हणजेच वर्षाला सुमारे २४ लाख रुपये खर्च वीज बीला पोटी खर्च कराव लागतो. हे फक्त घरफाळा आणि पाणीपट्टी यातूनच मिळालेल्या उत्पन्नातूनच भरावे लागते .

वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी तात्कालीन मंत्री विजयसिंह मोहीते पाटील यांनी जोतिबा ग्रामपंचायतीला ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून यात्रा कर वसूल करण्याची तरतूद करून दिली. त्याचबरोबर तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी जोतिबा ग्रामपंचायत पाणीपुरवठाच्या बिलाला हातभार लावण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रतिवर्षी एक लाख आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद करून दिली होती. सध्या फक्त जिल्हा परिषद ही मदत देते. मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आज पर्यंत जोतिबा ग्रामपंचायतीला मदत दिलेली नाही.

सुरुवातीला यात्रा कराच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचे उत्पन्न ज्योतिबा ग्रामपंचायतीला मिळत होते ते आज सुमारे पन्नास लाखांच्या घरात गेलय.२००४ च्या आसपास पाणीपुरवठ्याच्या वीज बिलापोटी २५ लाख रु द्यावे लागत होते. सध्या तेथे ३५ ते ४० लाख रूपये द्यावे लागतात.दोन वर्षापासून कोरोना संसर्गा मुळे यात्राच झाली नाही.परिणामी कराची वसुली थांबल्यामुळे जोतिबा ग्रामपंचायतीला सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे सध्या ग्रामपंचायतीची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. आणि नेमक्या याच परिस्थितीत वीज महावितरण कंपनीने थकीत बाकीमुळे पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

हेही वाचा- खांबाळेत आढळला जेसीबी प्रमाणे हालचाल करणारा ‘स्टिक इन्सेक्ट’

जोतिबा ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी व देखभाल दुरुस्तीचा खर्च जादा हि स्थिती असून त्यात दोन वर्ष कोरोनामुळे यात्रा झाली नाही. कर वसुली बंद आहे. या आर्थिक अडचणीत वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा योजनेची वीज तोडल्याने गावात पाणी टंचाई भासत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेने तीर्थक्षेत्राचे गाव म्हणून गावास विशेष सवलीती देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीस भरीव निधी देणे अवश्यक आहे.

शिवाजीराव सांगळे,उपसरपंच , जोतिबा डोंगर

loading image