esakal | करवीर निवासिनी श्री अंबाबाई, जोतिबा मंदिरे आजपासून खुली: असे मिळेल दर्शन 
sakal

बोलून बातमी शोधा

Karveer nivasini Ambabai Jotiba kolhapur temple open

सकाळी नऊ ते बारा, सायंकाळी चार ते सात या वेळेतच दर्शन 

करवीर निवासिनी श्री अंबाबाई, जोतिबा मंदिरे आजपासून खुली: असे मिळेल दर्शन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री जोतिबासह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारितील तीन हजार 42 मंदिरे उद्या (ता.16) पासून दर्शनासाठी खुली होणार आहेत. मात्र, सर्व मंदिरात सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी चार ते सात या वेळेतच भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. मास्क न घालणाऱ्या भाविकांवर दंडात्मक कारवाई होणार असून सोशल डिस्टन्ससाठी दर्शन रांगेची नेटकी व्यवस्था केली जाणार आहे. लहान मुले, गरोदर महिला व पासष्ठ वर्षावरील ज्येष्ठांना दर्शनासाठी परवानगी दिली जाणार नसल्याची माहिती आज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

हेही वाचा- इस्लामपुरात ‘रयत क्रांती’ विकास आघाडी बनवून लढेल


श्री अंबाबाई व जोतिबा मंदिरात सकाळी साडेनऊ वाजता होम-हवन होणार असून भाविकांच्या स्वागतासाठी फुलांच्या कमानी उभारल्या जाणार आहेत. सुरवातीला कोरोनायोध्दा भाविक व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना दर्शनासाठी प्राधान्य दिले जाणार असून अंबाबाई मंदिरात कासव चौकातूनच दर्शन घेता येणार आहे. आठ दिवसानंतर महाव्दार दरवाजामार्गे मुखदर्शनाची व्यवस्था केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सहसचिव शीतल इंगवले, जोतिबा देवस्थानचे महादेव दिंडे आदी उपस्थित होते. 

श्री अंबाबाईचे असे मिळेल दर्शन... 
- पूर्व दरवाजाजवळ मंडप. मंडपात सॅनिटायझेशन सुविधेसह वीज व पंख्यांची सुविधा. या दरवाजातून एका वेळी पंचवीस याप्रमाणे भाविकांना मंदिरात सोडण्यात येईल. दोन भाविकांमध्ये सहा फूटांचे अंतर असेल. तत्पूर्वी दर्शन घेतल्यानंतर दक्षिण दरवाजातून भाविक बाहेर पडतील. 
- सॅनिटायझेशन व थर्मल स्कॅनिंगनंतरच भाविकांना दर्शन रांगेत प्रवेश. सकाळी साडेअकरा व सायंकाळी साडेसहाला दर्शन रांगेत भाविकांना उभे रहाता येणार नाही. 
- सुरवातीचे आठ दिवस केवळ दर्शन मिळणार असून ओटी, हार-फुलांना मनाई असेल. भाविकांसाठी अभिषेक व अन्य पूजा होणार नाहीत. 
- अत्यावश्‍यक सेवेसाठी रूग्णवाहिका व तज्ञ डॉक्‍टरांची टीम कार्यरत असेल 
- बाहेरगावच्या भाविकांसाठी मोफत ऑनलाईन बुकींगची सुविधा करून त्यांना प्राधान्याने पण दर्शन रांगेतूनच दर्शनाची सुविधा 
- दिवसभरात अडीच ते तीन हजार भाविकांना दर्शनाचे नियोजन 
- मंदिराच्या आवारातील दुकाने सुरवातीचे काही दिवस बंदच राहणार

संपादन- अर्चना बनगे

loading image
go to top