Political News: जिल्हा बँकेच्या घडामोडींना येणार वेग; राष्ट्रवादीला मिळणार संधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KDCC Bank

जिल्हा बँकेच्या घडामोडींना येणार वेग; राष्ट्रवादीला मिळणार संधी?

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या (KDCC Bank Elections) अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड २० जानेवारीला होणाऱ्या नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत होणार आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयात दुपारी ३ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे (Arun Kakde)यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. आजच संचालकांना यासंदर्भातील नोटिसा पाठवल्या.

दरम्यान, अध्यक्ष पदासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हेच प्रमुख दावेदार असून काँग्रेसला उपाध्यक्षपदावर संधी मिळण्याची शक्यता आहे. शनिवारनंतर (ता. १५) घडामोडींना वेग येणार आहे.

हेही वाचा: निवडून येताच समर्थकांचा जल्लोष: जिल्हा बँकेवर सत्ताधाऱ्यांचा झेंडा

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्त्वाखालील सत्तारूढ आघाडीने २१ पैकी १८ जागा जिंकून एकतर्फी वर्चस्व मिळवले आहे. शिवसेनेलाही तीन जागा मिळाल्या आहेत. अध्यक्ष पदावर काँग्रेसने दावा केला असला तरी संख्याबळाचा विचार करता पहिल्यांदा राष्ट्रवादीलाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यातून मुश्रीफ हेच या पदाचे प्रमुख दावेदार असणार आहेत.

राष्ट्रवादी व पर्यायाने मुश्रीफ यांना मानणारे आठ संचालक आहेत. डॉ. कोरे यांच्या दोन जागांसह भाजपचे अमल महाडिक हेही सत्तारूढ गटासोबतच राहतील. माजी खासदार श्रीमती निवेदीता माने सत्तारूढ गटातून विजयी झाल्या असल्या तरी शिवसेनेने त्या आमच्यासोबत असतील असे जाहीर केले आहे. शाहूवाडी विकास संस्था गटातून विजयी झालेले रणवीर गायकवाड यांनी निकालादिवशीच आपण सत्तारूढ गटासोबत राहणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे पारडे जड आहे.

काँग्रेस, शिवसेनेच्या संख्याबळाचा विचार करता दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यातून अडीच वर्षे अध्यक्षपदाची वाटणी करून पहिल्यांदा हे पद राष्ट्रवादीला दिले जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारनंतर श्री. मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कोल्हापुरात येणार आहेत. त्यानंतरच या संदर्भातील घडामोडींना वेग येईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top