Kolhapur : सवलतीतील प्रवासी येणार रेकॉर्डवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

Kolhapur : सवलतीतील प्रवासी येणार रेकॉर्डवर

कोल्हापूर : ‘केएमटी’च्या प्रत्येक बसमध्ये जे तिकीट काढतात, तितकेच प्रवासी रेकॉर्डवर येतात. त्याशिवाय मासिक, दैनंदिन पास, ज्येष्ठ अशा विविध सवलतींतील प्रवाशांचे मोजमाप होत नाही. त्यामुळे त्या फेरीतील निश्‍चित प्रवासी संख्या व मिळणारे उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी आता प्रत्येक बसमध्ये स्वतंत्र कर्मचारी नेमून फेरीनिहाय प्रवासी व उत्पन्न शोधले जाणार आहे. नवरात्रीनंतर केएमटी प्रशासन त्यासाठी मोहीम राबविणार आहे.

केएमटीच्या बसचे बहुतांश मार्ग तोट्यात आहेत. हद्दवाढ कृती समितीने हे मार्ग बंद करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी प्रशासनाने अभ्यास करण्यास कालावधी मागून घेतला आहे. आतापर्यंत प्रत्येक मार्गावर किती बस होत्या, त्यांचे किती किलोमीटर रनिंग झाले, त्यातून प्रत्येक बसचे उत्पन्न किती मिळाले हे काढले जात होते. प्रत्येक मार्गावरील प्रत्येक फेरीनिहाय वेगवेगळी प्रवाशी संख्या असते. कधी एका फेरीत जाताना कमी तर येताना जादा उत्पन्न होते. त्यामुळे दिवसभरातील त्या बसचे उत्पन्न काढताना योग्य ताळमेळ होत नव्हता. त्यापेक्षा तो मार्ग तोट्यात आहे की फायद्यात हे लक्षात येत नव्हते.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उत्पन्न काढले जात असताना दररोज बसमध्ये जो तिकीट काढतो तोच प्रवाशी रेकॉर्डवर येतो. या प्रवाशांशिवाय मासिक, त्रैमासिक पासचे विद्यार्थी, अन्य प्रवासी असतात. तसेच दैनंदिन पास काढून जाणारे, ज्येष्ठांसाठीचा पास असलेले प्रवासीही असतात. मात्र, ते रेकॉर्डवर येत नाहीत. परिणामी, त्या मार्गावरील दिवसभरातील प्रवाशांची संख्या समजत नव्हती. त्यातून उत्पन्नही नीट समजून येत नव्हते. उत्पन्नाची आकडेवारी त्या मार्गावर असलेल्या वाहकाकडून दिलेल्या तिकिटावर व जमा केलेल्या पैशांतून मिळत होते. तिकीट मशीनमधून त्या फेरीनिहाय दिलेल्या तिकिटांची संख्या, पैसे मिळतात; पण पासची आकडेवारी उपलब्ध होत नाही. परिणामी, प्रत्येक फेरीनिहाय माहितीही मिळण्यास अडचणी होत्या.

सध्या ६५ ते ७० पर्यंत बस विविध मार्गांवर धावतात. त्यांच्या प्रत्येक फेरीतील प्रवाशांची मोजमाप आता केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमला जाणार आहे. त्याच्याकडून त्या फेरीत किती प्रवाशांनी प्रवास केला, किती उत्पन्न मिळाले याची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानुसार त्या मार्गावरील फेऱ्यांचा अभ्यास केला जाणार आहे. नवरात्रीमध्ये अनेक बस नवदुर्गा दर्शनासाठी दिल्या जात असल्याने त्यानंतर ही मोहीम राबवली जाणार आहे.

प्रत्येक फेरीतील माहिती संकलित करण्यास तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे स्वतंत्र कर्मचारी नेमून फेरीनिहाय माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे प्रशासनाला निश्‍चित आकडेवारी मिळेल.

- टीना गवळी, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक, केएमटी

Web Title: Kolhapue Stbus Discounts For Passengers Kamt Campaign Bus Ticket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurSTst busticket