कोल्हापूर: सहकारातील निवडणुकांचा धडाका सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर: सहकारातील निवडणुकांचा धडाका सुरू

कोल्हापूर: सहकारातील निवडणुकांचा धडाका सुरू

कोल्हापूर: कोरोनामुळे गेल्या दिड वर्षापासून स्थगित ठेवलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती आज राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने उठवली. पहिल्या टप्प्यातील संस्थांची प्रक्रिया २० सप्टेंबरपासून सुरू करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.

हेही वाचा: बेळगाव: दुचाकी चोरट्याच्या बेळगाव पोलीसांनी मुसक्या आवढल्या

दरम्यान, प्राधिकारणाच्या या आदेशानुसार जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील ६२४ संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार असून त्यात पार्श्‍वनाथ बँक, राजर्षी शाहू गर्व्हमेंट सर्व्हंटस बँक, शरद साखर कारखाना आदि संस्थांचा समावेश आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील २२४ विकास सोसायट्यांच्याही निवडणुकीचा मार्ग या नव्या आदेशाने मोकळा झाला आहे.

राज्य शासनाने पहिल्यांदा कर्जमाफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ३१ जानेवारी २०२० रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. त्यानंतर राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन १८ मार्च २०२० रोजी पुन्हा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर वेळोवेळी किमान सातवेळा या संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. यातून काही संस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर ‘गोकुळ’ सारख्या संस्थांची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली. पण ३१ ऑगष्ट २०२१ पर्यंत इतर संस्थांच्या निवडणुकांना स्थगितीच होती.

संस्थांच्या निवडणुकींना दिलेली स्थगितीची मुदत संपून आज १३ दिवस झाले पण दरम्यानच्या काळात राज्य सरकारने कोणताही आदेश काढलेला नाही. या मुद्यावरच सहकार निवडणूक प्राधिकरणाने आज पहिल्या टप्प्यातील सर्व संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश काढले. पहिल्या टप्प्यातील ज्या संस्थांची नामनर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशा संस्था वगळून इतर संस्थांची प्रारूप मतदार यादीची प्रक्रिया ३१ ऑगष्ट २०२१ च्या अर्हता दिनांकावर सुरू करण्याचे आदेशात म्हटले आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत जिल्हा आराखडा सादर करण्यात आला होता. त्यात संस्थांचे अ, ब, क, व, ड असे वर्गीकरण करण्यात आले होते. ज्या अ, व, ब, वर्ग गटातील सहकारी संस्थांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशा संस्थांची पुढची प्रक्रियाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. क वर्गातील संस्थांच्या निवडणुकीसाठी तालुका उपनिबंधकांची मान्यता घेण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील या संस्थांच्या होणार निवडणुका

अ वर्ग - १२ (नागरी, बँका, सहकारी साखर कारखाने, सुतगिरणी)

ब वर्ग - २२३ (विकास सोसायटी)

क वर्ग - १९० (लहान पतसंस्था, इतर संस्था)

ड वर्ग - १९९ (मजूर संस्थांसह इतर छोट्या संस्था)

Web Title: Kolhapur Co Operative Elections Begin

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapurelection