esakal | kolhapur : कोरेंच्या विरोधात कोण, हीच उत्सुकता
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur : कोरेंच्या विरोधात कोण, हीच उत्सुकता

kolhapur : कोरेंच्या विरोधात कोण, हीच उत्सुकता

sakal_logo
By
आनंद जगताप : सकाळ वृत्तसेवा

पन्हाळा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पन्हाळा तालुक्यातून विकास सोसायटी गटात सध्या तरी विद्यमान संचालक आमदार विनय कोरे यांच्या विरोधात कोणी दिसत नाही. यापूर्वी एका निवडणुकीत ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके यांचे पुत्र संदीप यांनी श्री. कोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती; पण सध्या तरी नरके गटात शांतता आहे.

दरम्यान, प्रक्रिया संस्था गटातील संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना रोखण्याची व्यूहरचना कोरे गटाकडून आखली जात आहे. त्यातून कोतोलीचे जि. प. सदस्य शंकर पाटील यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत श्री. कोरे यांना साथ दिलेले अमर पाटील ‘गोकुळ’वर गेल्याने हा गटही श्री. कोरे यांच्यासोबत राहील. जिल्हा बँकेची निवडणूक निश्चित होत असली तरी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध नाही. प्रारूप मतदार यादीस पन्हाळा तालुक्यात फारशी मागणी नाही. तरीही विकास सेवा संस्था गट आणि प्रक्रिया संस्था गटात संभाव्य उमेदवार सक्रिय झाले आहेत. तालुक्यात एकूण २५२ विकास सेवा संस्थांपैकी २४७ संस्था पात्र आहेत. त्यांपैकी २४४ संस्थांची कच्ची मतदार यादी तयार आहे. यांपैकी २१० संस्थांचे ठराव हे आमदार कोरे यांच्या बाजूने असल्याने ते दुसऱ्यांदा संचालक म्हणून बिनविरोध निवडून येण्याचे संकेत आहेत.

हेही वाचा: Kolhapur : हद्दपारी कारवाईत जिल्हा आघाडीवर

प्रक्रिया संस्था गटातून राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर गतवेळी निवडून आले होते. यावेळी ते महाविकास आघाडीतून शड्डू ठोकणार आहेत. या गटातून ९६ ठराव दाखल केले आहेत. त्यांपैकी ९१ ठराव पात्र असून उर्वरित पाच संस्थांसाठी तडजोडी सुरू आहेत. पाणीपुरवठा, दूध संस्था आणि अन्य संस्था गटांसाठी एकूण ११६० ठराव आहेत; पण त्यांपैकी ४९१ संस्था बंद असल्याने नेतेमंडळी याबाबत काय भूमिका घेतात याकडे संस्थांचे लक्ष लागले आहे, तर नागरी बँका, पतसंस्था गटांसाठी १३२ ठराव दाखल असून त्यांपैकी ११० संस्था पात्र आहेत. अंतिम यादी २७ सप्टेंबरला प्रसिद्ध झाल्यानंतरच अन्य इच्छुकांची गर्दी वाढणार आहे.

दृष्टिक्षेपात पन्हाळा तालुका

विद्यमान संचालक : आमदार विनय कोरे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर.

एकूण संस्था ८७०

विकास सेवा संस्था गट २४४

प्रक्रिया संस्था गट ९६ पैकी ९१ पात्र

नागरी बॅंका, पतसंस्था गट ११०

पाणी, मजूर व अन्य संस्था ४३२

loading image
go to top