
कोल्हापूर : महिलांच्या ४० राखीव जागांची उत्सुकता
कोल्हापूर : अनुसूचित जाती तसेच जमातीच्या १३ जागा राखीव असलेल्या कोणत्या प्रभागात ओबीसीच्या चार जागा तसेच ओबीसी व सर्वसाधारणमधील महिलांच्या ४० जागा कोणत्या प्रभागात येणार? याची उत्कंठा आहे. या जागांसाठीच प्रामुख्याने सोडत काढली जाईल. २२ ओबीसींपैकी १८ जागा या अनुसूचित जाती, जमातीच्या जागा असलेले प्रभाग सोडून अन्य १८ प्रभागात थेट दिल्या जाणार आहेत. प्रत्येक प्रभागात एक तरी जागा सर्वसाधारणसाठी राहण्याची शक्यता आहे. तसेच सर्वसाधारणच्या २८ जागा कोणत्या प्रभागात राहणार याचीही उत्सुकता आहे.
३१ मे रोजी अनुसूचित जाती व जमातीसह त्यातील महिलांसाठीच्या जागांसाठी सोडत काढली होती. राज्य निवडणूक आयोगाने ते आरक्षण कायम ठेवल्याने त्याव्यतिरिक्त आलेल्या ओबीसींच्या २२ जागा तसेच सर्वसाधारण महिलांसाठीच्या २९ जागांसाठी शुक्रवारी सोडत काढली जाणार आहे. ओबीसीच्या २२ पैकी १८ जागा थेट दिल्या जाणार आहेत. तर उर्वरित चार व ओबीसी तसेच सर्वसाधारणमधील महिलांसाठी सोडत काढली जाईल.
प्रथम ओबीसीच्या ज्या १८ जागा थेट देण्यात येणार आहेत, तेथून सुरुवात होईल. त्यानंतर ज्या १३ प्रभागात अनुसूचित जाती व जमातीच्या जागा आरक्षित आहेत, त्या प्रभागांच्या चिठ्ठ्या टाकून ओबीसीच्या चार जागांची सोडत काढण्यात येईल. महिलांसाठीच्या एकूण ४० जागा सोडतीद्वारे काढणार आहेत. ओबीसी महिलांच्या ११ जागांसाठी सोडत तसेच काही जागा थेट देणार आहेत. त्यानंतर दोन जागा महिलांसाठी आरक्षित नसतील, अशा प्रभागातील एक जागा थेट सर्वसाधारणमधील २९ महिलांसाठी मिळण्याची शक्यता आहे. सोडत कशी निघेल? यावर दोन प्रभागात सर्वसाधारणची जागा मिळेल, की नाही हे ठरणार आहे. सर्वसाधारण गटासाठी कोणत्या जागा मिळणार हे सर्वात शेवटी स्पष्ट होईल.
आरक्षित जागांसाठी व्यवस्था
अनुसूचित जाती, जमातीच्या जागांबरोबर ओबीसीच्या जागा त्यानंतर सर्वसाधारण गटाच्या जागा असे टप्पे सोडतीचे येणार आहेत. एकाच प्रभागात वेगवेगळे आरक्षण येणार असल्याने अ, ब, क नुसार तीन जागा वेगवेगळ्या दाखवता येणार आहेत. ही व्यवस्था नागरिकांचा संभ्रम दूर करण्यास मदत करणार आहे.
आता चर्चा निवडणूक कधीची?
तिसऱ्यांदा सोडत निघत असताना आता तरी निवडणूक होणार का? असा प्रश्न जवळपास प्रत्येक इच्छुकाच्या मनात आहे. नवीन सरकार आले असल्याने या प्रश्नाला बळ मिळत असल्याची चर्चा आहे. सरकारकडून काही निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा असल्याने काही जाणकारांकडून निवडणूक डिसेंबरपर्यंत पुढे जाईल, असे सांगितले जात आहे.
अनुसूचितसाठी राखीव जागांचे १३ प्रभाग असे
१, २, ४, ५, ७, ९, १३, १५, १८, १९, २१, २८, ३०.
यात महिलांसाठी राखीव
४, ७, ९, १३, २८, ३०.
ओबीसी जागा थेट
जाणारे १८ प्रभाग असे
३, ६, ८, १०, ११, १२, १४, १६, १७, २०, २२, २३, २४, २५, २६, २७, २९, ३१.
उर्वरित चार जागा सोडतीतून मिळणार
Web Title: Kolhapur Curious About Reserved Seats Women
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..