Kolhapur: अटींच्या पूर्ततेत पूरग्रस्त व्यावसायिक घाईला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur-Flood

कोल्हापूर : अटींच्या पूर्ततेत पूरग्रस्त व्यावसायिक घाईला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरात आलेल्या महापुरात दुकानातील साहित्य वाहून गेले, काहींचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे झाले. याला तीन महिने उलटले तरीही अद्याप भरपाईची दमडीही मिळालेली नाही. पूरग्रस्त व्यावसायिकांची ही स्थिती आहे. करवीर तहसील, महापालिकेत फेऱ्या मारून दमलेल्या व्यापाऱ्यांची ही व्यथा ऐकणार तरी कोण? अशी स्थिती आहे.

जिल्ह्यात महापुराने थैमान घातले. शहरासह जिल्ह्यात पिकांसह प्रापंचिक साहित्य, दुकानांतील साहित्याचे नुकसान झाले. मंत्र्यांचे दौरे झाले. अधिकाऱ्यांचे दौरे झाले. तातडीने पंचनामा करण्याचे आदेश झाले. पंचनामे ही झाले. मात्र, त्यानंतर आजपर्यंत नुकसान भरपाईची दमडीही पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांना मिळालेली नाही.

हेही वाचा: "कंगनाचं ते वक्तव्य चुकीचं पण..."; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

कसबा बावडा येथील भगवा चौक, रेणुका मंदिर, ते शिये टोलनाका परिसरातील काही दुकानदारांची ही अवस्था आहे. याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता पंचनामे झाले. नुकसान भरपाईची मागणीही झाली. मात्र ती का मिळत नाही, म्हणून येथील चावडीत त्यांनी चौकशी केली. तेथे करवीर तहसील कार्यालयात जाण्यास सांगितले. तेथे चौकशी गेल्यानंतर त्यांना महापालिकेत जावा म्हणून सांगितले. संबंधित दुकनदारांनी महापालिकेत जाऊन चौकशी केली तर तेथील अधिकाऱ्यांनी शॉपॲक्ट परवाना मागितला.

त्याची पूर्तता करताना महापालिकेचा परवाना मागितला. तो नाही म्हणून सांगताच तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही म्हणून सांगितले. मात्र, ज्यांनी दोन्ही परवाने दिले तर त्यांची नुकसान भरपाई केव्हा मिळणार म्हणून विचारणा केली असता ‘ते राज्य शासनाला विचारा’ असे उत्तर महापालिकेतून दिल्याचे सांगण्यात आले. नुकसान झाले आहे, पंचनामा झाला आहे, तर आता परवाने मागण्याची ही वेळ आहे काय ? असाही सवाल छोट्या व्यावसायिकांनी केला आहे. पंचनामा केला तेव्हा नुकसान झाले हे दिसले नाही का? अशीही नाराजी व्यावसायिकांनी व्यक्त केली.

शिये टोलनाक्याच्या रस्त्याला सर्व्हिसिंग सेंटर आहे. हॉटेलही आहे. २०१९ मध्ये महापुरात नुकसान झाले, तेव्हा पंचनाम्यावर सेंटरला ५० हजारांवर भरपाई मिळाली होती. यावेळी मात्र शॉप ॲक्ट परवाना पाहिजे म्हणाले. तो दिल्यानंतर आता महापालिकेचा परवाना पाहिजे म्हणतात. मात्र, ज्यांनी हे दोन्ही परवाने दिले आहेत, त्यांनाही नुकसान भरपाई मिळालेली नाही.

- सचिन खामकर, पूरग्रस्त कसबा बावडा.

loading image
go to top