कोल्हापूर : दीड लाख गणेशमूर्ती जाणार परराज्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Ganesh festival idols demand increased

कोल्हापूर : दीड लाख गणेशमूर्ती जाणार परराज्यात

कोल्हापूर : दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव घरातच साजरा झाला. यंदा मात्र कोरोनाचे विघ्न बहुतांशी टळले आणि गणेशोत्सव दिमाखात साजरा करण्याचा मार्ग खुला झाला. तशी घरगुती आणि सार्वजनिक मंडळांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. स्थानिकांबरोबर परप्रातांतील मंडळे व कुटुंबीयांनी कोल्हापुराच्या मूर्तिकारांकडून गणेशमूर्ती मागवल्या आहेत. त्यानुसार यंदा दीड लाखावर मूर्ती गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणाकडे जाणार आहेत. एकाच वेळी बहुविध रूपातील आणि वाढीव उंचीच्या मोठ्या मूर्तींची मागणी वाढली आहे. कुंभार बांधवाकडे अपुरे मनुष्यबळ असूनही मूर्ती वेळेत देण्यासाठी कुंभार बांधवांचे कुटुंबच मूर्ती कामात गुंतले आहे.

कोल्हापूरच्या मूर्तिकारांनी बनवलेली मूर्ती म्हणजे मानाची, परंपरेचा साज असलेली. या मूर्तीची बहुविध रूप, कोरीव काम, रंगसंगती मोहीत करणाऱ्या आहेत. अशा गुणवैशिष्ट्यांनी सजलेल्या मूर्ती करण्यात कोल्हापुरी मूर्तिकारांचा हातखंडा आहे. असा लौकिक दूरवर पोहचला आहे. त्यामुळे साहजिकच लहान-मोठ्या मूर्ती कोल्हापुरातून बनवून, मागवूण घेणे हा परराज्यातही कौतुकाचा विषय आहे. त्यानुसार परराज्यातील मूर्तिकार व मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोल्हापुरातून मूर्ती बनवून घेण्याचा निर्धार करत ऑर्डरही नोंदवल्या.

स्थानिक गरजेच्या दहा लाख मूर्ती बाहेरच्या राज्यातील दोन लाख अशा अंदाजे बारा लाख मूर्ती बनविण्याचे उद्दिष्‍ट साध्य करणे कुंभार बांधवासाठी आव्हान ठरले. शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी कुंभार गल्ली व बापट कॅम्प येथील कुंभार बांधवाकडे मूर्तिकाम सुरू झाले. मोठ्या ऑॅर्डर जागेवर पूर्ण करणे अशक्य असल्याचा अंदाज येताच ग्रामीण भागातील कुंभारकाम करणारे तरुण मूर्तिकार आणले. कच्च्या मूर्ती बनविल्या. त्याच मूर्ती परराज्यात कमी किमतीत पाठवल्या. त्यासोबत स्थानिक मूर्तिकारही पाठवले. त्यांनीही एक दोन महिने तेथे राहून कच्च्या मूर्तीचे रंगलेपन करून मूर्ती लक्षवेधी बनवून दिल्या. हेच मूर्तिकार परत कोल्हापुरात आले. दुसऱ्या टप्प्यात सार्जनिक मंडळांच्या मूर्तीचे काम सध्या सुरू आहे.

ग्रामीण मूर्तिकार मदतीला

येत्या वीस दिवसांत जवळपास १० हजारांवर मोठ्या मूर्ती बनवाव्या लागतील. त्यासाठी ग्रामीण भागातील मूर्तिकारांचे कुशल मनुष्यबळ कुंभार बांधवांच्या मदतीला आले आहे. मात्र, ऑॅर्डर जास्त असल्याने त्या पूर्ण करण्यासाठी कुंभारांच्या घरातील महिला पुरूष रात्र दिवस मूर्ती कामात गुंतले आहेत.

गणेश मूर्तीला देवाची मूर्ती म्हणून श्रद्धेची जोड आहे. मूर्ती भारदस्त असावी, तिचे रूप विलोभणीय, प्रसन्न तितकेच मांगल्याचे असावे असा भाव मूर्तीतून व्यक्त व्हावा, अशी रचना केलेली असते. यात रंगसंगती व सूक्ष्म बारकावे घेऊन कोरीव काम केलेले असते. हीच कोल्हापूरच्या मूर्तीची वैशिष्‍ट्ये अन्यत्र सहजपणे दिसत नाहीत म्हणून कोल्हापूरच्या १ ते २१ फुटी मूर्तीची स्थानिक तसेच पर राज्यातही मोठी मागणी आहे.

- सचिन वारनूळकर, मूर्तिकार

Web Title: Kolhapur Ganesh Festival Idols Demand Increased

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..