esakal | Kolhapur : ‘ऑनलाईन बुकिंग असेल तरच दर्शन’
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur : ‘ऑनलाईन बुकिंग असेल तरच दर्शन’

Kolhapur : ‘ऑनलाईन बुकिंग असेल तरच दर्शन’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नवरात्रोत्सवात अंबाबाई दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगच करावे लागणार आहे; मात्र मुखदर्शनासाठी असे बुकिंग गरजेचे असणार नाही. पहाटे चार ते रात्री नऊपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. जोतिबा मंदिरात केवळ ई-पासद्वारेच प्रवेश दिला जाणार आहे. मंदिर पहाटे तीन ते मध्यरात्री एकदरम्यान दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. अंबाबाई मंदिरात या काळात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षीही होणार नाहीत. मंदिर परिसरात स्क्रीन उभारले जाणार असून तेथे मंदिरातील धार्मिक विधी पाहता येणार आहेत. ऑनलाईन बुकिंग ५ ऑक्टोबरला खुले होणार आहे. टप्प्याटप्प्याने दोन-तीन दिवसांचे ऑनलाईन बुकिंग खुले केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पाटील यांनी सांगितले, की नवरात्रोत्सव गुरुवार (ता. ७) पासून सुरू होत आहे. मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून केवळ ऑनलाईन बुकिंग केलेल्या व्यक्तींनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल. या बुकींगसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यामुळे ठराविक वेळेतच दर्शन मिळणार, याची खात्री मिळणार आहे. सुमारे तासभरात किमान पाचशे लोकांना दर्शनाची संधी मिळणार आहे. बुकिंगसाठी मोबाईल क्रमांक आणि आधारकार्डचा क्रमांक आवश्‍यक आहे. एका वेळी एकाच क्रमांकावरून एकच बुकिंग होणार आहे. मुखदर्शनाचा लाभ सर्वांना घेता येईल. यासाठी महाद्वारवरून रांगेची व्यवस्था असेल. बिनखांबी गणेश मंदिरापासून पुढे ही रांग असणार आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ व्यासपीठ केले जाणार आहे. तेथून मुखदर्शन घेता येणार आहे.

एका रांगेत साधारण तिघे असतील, अशी व्यवस्था असेल. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दहा वर्षांखालील मुले, गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाजी चौक आणि बालगोपाल तालीम परिसरातून प्रवेश बंद केला जाणार असून तेथेच पादत्राणे स्टॅण्ड उभारण्याचे नियोजन आहे. मंदिरातील दररोजच्या पालखी सोहळ्यासह आरतीलाही भाविकांना प्रवेश नसणार आहे. व्हीआयपी, व्हीव्हीआयपी अशी कोणतीही स्वतंत्र रांगसुद्धा असणार नाही. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, प्रांत वैभव नावडकर उपस्थित होते.

नियोजन असे

  • मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम नित्यनियमाने होतील

  • विधींचे स्क्रीनद्वारे प्रक्षेपण

  • गरुड मंडपातील अभिषेक बंद

  • मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

  • ललिता पंचमीची पालखी आणि नगरप्रदक्षिणा वाहनातून

  • देणगीसाठी ‘क्यूआर’ कोडची व्यवस्था

जोतिबा दर्शनासाठी अशीच व्यवस्था

दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शनही ई-पासद्वारेच होणार आहे. मंदिर पहाटे तीन ते मध्यरात्री एक दरम्यान खुले राहणार आहे. जिल्ह्यातील सर्वच मंदिरांनी राज्य शासनाच्या नियमाप्रमाणेच उत्सव साजरा करावा, यासाठी जिल्हाधिकारी स्वतंत्र नियमावलीही लवकरच जाहीर करतील. जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ, पुजाऱ्यांची बैठक झाली आहे. त्यात केवळ ई-पास असणाऱ्यांनाच प्रवेश देण्याचे निश्‍चित झाले आहे. त्यानुसार हा निर्णय घेतल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top