
कोल्हापूर-मुंबई धावणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस आजपासून 13 दिवस रद्द, तर कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा ही स्थगित
कोल्हापूर, मिरज (सांगली): कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे लागू केलेल्या संचारबंदीचा फटका रेल्वे प्रशासनाला बसला आहे. बहुतांश गाड्या अल्प प्रतिसादामध्ये धावत असल्याने तब्बल दहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यात कडक संचारबंदी मुळे कोल्हापूर- मुंबई गाडी क्रमांक (01412) कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस 27 एप्रिल पासून ते 10 मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे. तर मुंबई-कोल्हापूर गाडी क्रमांक (01411) महालक्ष्मी एक्सप्रेस 28 एप्रिल पासून 11 मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
सद्य:स्थितीला महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे सेवा सुरू ठेवण्यात आली. मात्र 15 एप्रिलपासून संचारबंदी लागू झाल्यानंतर गेले आठवडाभर प्रवाशांची गावी परतण्याची धडपड सुरू असल्याने सर्व गाड्या फुल्ल होत्या. मात्र दिवसागणिक पुन्हा रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे मार्गाने प्रवास करणे टाळल्याने अनेक मार्गावरील रेल्वे गाड्या अल्प प्रवासी घेऊन धावत आहेत. या अनुषंगाने मध्य रेल्वेने तब्बल 10 एक्सप्रेस गाड्या 11 मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोविड महामारीचा फटका कोल्हापूर विमानतळालाही बसला असून ७५ टक्के प्रवासी घटले आहेत. अहमदाबाद विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. बेळगाव विमानसेवा आठवड्यातून केवळ चार दिवस सुरू आहे. दिवसांतून तीन वेळा विमानतळ, प्रवाशाची बॅग, विमान सॅनिटायझर केले जात आहे. कोविडमुळे नाईट लॅण्डिंगसाठी आलेल्या गतीलाही आता ब्रेक लागला आहे.
कोल्हापूर विमानतळावर रोज सुमारे ४५० ते ५०० प्रवाशांची ये-जा हो त होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. आज केवळ १००च्या आसपास प्रवासी ये-जा करीत आहेत. नव्याने सुरू झालेली अहमदाबाद विमानसेवा तर ३० एप्रिलपर्यंत प्रवासी नसल्याच्या कारणावरून बंद केली आहे. बंगळूर, हैदराबाद, तिरुपती, मुंबई विमानसेवा सुरू आहेत. बंगळूर केवळ चारच दिवस तर मुंबई तीन दिवस सुरू आहे. एकंदरीतच विमानतळाच्या उत्पन्नात घट झाली आहे. कोविड प्रतिबंधक उपाययोजनाही विमानतळावर काटेकोरपणे पालन कराव्या लागत आहेत.
विमानतळ दिवसातून तीन वेळा सॅनिटायझर केले जात आहे. प्रवाशांसाठी सोशल डिस्टन्ससह इत-र उपाय योजना केल्या आहेत. प्रवाशांना सोशल डिस्टन्स् ठेवूनच बैठक व्यवस्था केली आहे. प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग केल्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जात नाही. एवढंच नव्हे तर प्रवासी कोल्हापुरात आला तर त्यांना थेट होमक्वारंटाईन केले जाते. त्याचा डाटाही विमानतळ प्रशासनाकडे तयार आहे. देश-विदेशातील प्रवाशांवरच कोरोना महामारीचा परिणाम झाला आहे. त्याचाच फटका थेट कोल्हापुरातील विमानसेवेला ही बसला आहे.
नाईट लॅंडिंगला ‘ब्रेक’च
विमानतळावर नाईट लॅंडिंग होण्यासाठी खासदार, पालकमंत्री यांनी विमानतळ प्राधिकरण, डीजीसीए यांच्या अधिकाऱ्यांबरोबर दिल्लीत बैठक घेतली. यात एप्रिलपर्यंत नाईट लँडिंगचे काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र, कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने, देशभरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाईट लँडिंगच्या प्रक्रियेलाही ‘ब्रेक’ लागला आहे.
विमानतळावर सुमारे २०० कर्मचारी आहेत. पैकी एक कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह असून, त्याच्यावरही यशस्वी उपचार झाले आहेत. संसर्गापासून दूर राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना एकत्रित बसू दिले जात नाही. प्रवाशांच्या बॅगेसह विमानही सॅनिटायझर केले जाते. देश-विदेशातील प्रवाशांचा फटका कोल्हापूर विमानतळालाही बसला आहे.
- कमलकुमार कटारिया, प्रबंधक, कोल्हापूर विमानतळ
Edited By- Archana Banage
Web Title: Kolhapur Mumbai Mahalakshmi Express Canceled For 13 Days From Today Kolhapur Ahmedabad Flight
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..