
कोल्हापूर : महापालिकेची निवडणूक पावसाळ्यानंतरच
कोल्हापूर: प्रभागरचना निश्चिती, प्रभागांचे आरक्षण तसेच मतदार यादी कार्यक्रमासाठी लागणारा वेळ पाहता पावसाळ्यानंतरच महापालिकेची निवडणूक होण्याची चिन्हे असल्याचे सूतोवाच पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केले. तसेच, आता निवडणूक थांबण्याची शक्यता नसल्याचेही सांगितले. दरम्यान, मार्चमध्ये सादर केलेल्या प्रभागरचनेला आठ ते दहा दिवसांत निवडणूक आयोग मंजुरी देऊन ती जाहीर करण्यासाठी महापालिकेला आदेश देण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने कार्यवाहीला सुरुवात केली आहे. आयोगाने तातडीने महापालिकेकडून प्रभाग रचनेबाबतची माहिती मागवून घेतली. यापूर्वी महापालिकेने हरकती, सुनावणी घेऊन अभिप्रायही आयोगाकडे पाठवला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे शहरवासीयांचे तसेच
इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत त्यांना विचारले असता, पालकमंत्री सतेज पाटील यांनी निवडणूक पावसाळ्यानंतर गणेशोत्सव ते दिवाळी या दरम्यान होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर आरक्षणाची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम होणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याचा कालावधी पाहता पावसाळा सुरू होईल. त्यावेळी निवडणूक प्रक्रिया राबवणे शक्य नसल्याने पावसाळा झाल्यानंतरच ती राबविली जाईल. ३० ते ४५ दिवसांचा कार्यक्रम पाहता शक्यतो दिवाळीच्या दरम्यानच मतदान होईल असे वाटते.
इच्छुकांची चक्रे लागली फिरू
निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे तसेच ओबीसी आरक्षणाविना होणार असल्याचे सध्या तरी स्पष्ट आहे. त्यामुळे इच्छुक पुन्हा तयारीला लागले आहेत. त्रिसदस्यीमुळे मोठा प्रभागात फिरावे लागणार असून त्यादृष्टीने आपल्या हक्काच्या सोडून इतर भागांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. तेथील कार्यकर्त्यांशी भेटीगाठी सुरू केल्या असून आणखी कोण इच्छुक असेल, त्याचा फायदा की तोटा होईल याची समीकरणे आकारास आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
Web Title: Kolhapur Municipal Elections After Monsoon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..