kolhapur : पं. नीळकंठबुवा चिखलीकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur news

kolhapur : पं. नीळकंठबुवा चिखलीकर

साधारण १९४० च्या सुमाराचा काळ, सी रामचंद्र, वसंतराव देशपांडे ही मंडळी नशीब आजमावण्यासाठी त्याकाळी कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीत आली होती. भुर्जीखां, विश्वनाथबुवा जाधव, वामनराव सडोलीकर यांच्यासारखी माणसं संगीत देत होती. वसंतराव देशपांडेंनी ज्या काही नावांचा व गायकमंडळींचा त्या काळी कोल्हापुरात राबता होता त्यांत वरील नावांसमवेत वामनराव पाध्ये, नीळकंठबुवा चिखलीकरांचा उल्लेख केला आहे. नीळकंठबुवांचा जन्म १९१३ चा, आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव रघुनाथ; पण ते लहान असतानाच दोघेही वारल्याने त्यांचा सांभाळ आजीने केला व त्या चिखलीहून नातवाला घेऊन कोल्हापुरात आल्या.

हेही वाचा: Kolhapur : कोल्हापूर-सांगली मार्गावर कोंडी

लहानपणापासूनच शालेय शिक्षण घेताघेताच आसपासच्या सांगीतिक वातावरणाचा प्रभाव पाहून त्यांनाही गाण्याची आवड उत्पन्न झाली. आजीने नातवाची आवड ध्यानी घेऊन संगीत शिक्षणासाठी त्यांना वामनराव पाध्येबुवांकडे ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकण्यासाठी अक्षरशः पायावर घातले. बुवांनी मुलांची आवड लक्षात घेऊन त्याला घडवणे सुरू केले. ४-६ वर्षे पाध्येबुवांची तालीम घेऊन स्वरतालाचा पाया भक्कम करत त्यांनी हार्मोनियम वादनाचेही धडे गिरवले.

हेही वाचा: kolhapur : निष्ठेमुळे राजकीय भविष्य उज्ज्वल

यानंतर प्रौढगंधर्व विश्वनाथबुवांकडे किराणा घराण्याची गायकी आत्मसात करू लागले. स्वरांचा लगाव, बंदीशीची मांडणी, त्यातील सौंदर्यस्थळे, आलापी व इतर संगीत अलंकार गळ्याबरोबरच बोटावरही उतरले. प्रौढगंधर्वांनंतर बरीच वर्षे तुळजाभवानी मंदिरात ते दरबार गायक म्हणून सेवा बजावायचे व दरम्यान एक उत्तम हार्मोनियम वादक म्हणूनही संगीत क्षेत्रात त्यांनी नाव केले. तुळजाभवानी मंदिरातील दरबारगायक म्हणून सेवा करतानाच तेथील शाहूसंगीत विद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी कित्येक वर्षे ते पद भूषवले.

हेही वाचा: Kolhapur : रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे सुबक शिल्प

शाहू संगीत विद्यालयाचे प्राचार्य व गायक, हार्मोनियम वादक असल्याने दरवर्षी टाऊन हॉल मागील शिवाजी मंदिरामधे शिवजयंती उत्सव, रामनवमी, दत्तजयंती, छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती, छत्रपती राजाराम महाराज जयंती, अशा विविध उपक्रमांत त्यांचे गायन हमखास असायचे व ते रंगतदार व्हायचे. ‘सौभद्र’ या संगीत नाटकात त्यांनी नारदाची भूमिका केली होती. याचबरोबर त्यांनी कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन म्हणून कोल्हापूरच्या भक्तीसेवा विद्यापीठात गानशिक्षक म्हणून नोकरी केली, त्यानंतर ३० वर्षांवर व तेथूनच ते सेवानिवृत्त झाले; पण एक उत्तम गानशिक्षक व हार्मोनियमवादक या दोन्ही नात्यांनी विद्यापीठातून व शिकवण्यातून अनेक नामवंत शिष्य घडवले.

हेही वाचा: Kolhapur : डेपोतील कचरा रस्त्यावर

एम. जी. पटवर्धन (रत्नागिरीचे), आशा चिले, अरुण जेरे, चित्तरंजन जनवाडकर, प्रकाश शुक्ल, घनःशाम वेंगुर्लेकर, योगीता गुरव, डॉ. मृदुला जामसांडेकर, चंद्रहास सेवेकरी ही त्यांच्या काही महत्त्वाच्या शिष्यांची नावे.कोल्हापूर मुक्कामी १४ मे १९९१ मध्ये या गायक व हार्मोनियम वादकाचे निधन झाले. (संदर्भ- विनोद डिग्रजकर व चिखलीकर कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीचे आधारे)