
कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा तिढा केवळ पंतप्रधान सोडवू शकत असल्याने, त्यांची भेट घेण्याची हीच वेळ आहे; अन्यथा मराठा आरक्षण कधीच मिळणार नाही, असे सूतोवाच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना जोडण्याचे वसंतराव मुळीक यांचे कार्य अद्वितीय असून, समविचारी व्यक्तींना एकत्र करून पुरोगामी दिशेने पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या कार्यकर्तृत्वाच्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुळीक यांचा मराठा महासंघाचे स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार केला. त्यांना लोकवर्गणीतून चारचाकी गाडी प्रदान केली. या वेळी अभियंता एस. एन. पाटील यांनी मराठा भवनसाठी ५१ हजार, तर माजी नगरसेवक अशोक माने यांनी दहा हजार रुपयांचा धनादेश दिला. अखिल भारतीय मराठा महासंघ, वसंतराव मुळीक नागरी सत्कार समिती, राजर्षी शाहू सलोखा मंच, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टतर्फे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम झाला.
शाहू महाराज म्हणाले, ‘देशात वेगवेगळ्या जाती-धर्मांचे लोक राहत आहेत. त्यांच्यात दरी निर्माण करून देशाची विभागणी पुन्हा होते की काय, असे चित्र आहे. समतेच्या दिशेने पावले टाकल्यास समाजाची प्रगती होणार आहे. शाहूंच्या नगरीत सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्र येऊ शकतात, हे मुळीक यांनी दाखवून दिले आहे.’आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘मुळीक हे लोकप्रियतेचे प्रतीक असून, मराठा समाजासाठी निरपेक्ष वृत्तीने काम करत आहेत.’
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘मुळीक हे नि:स्वार्थीपणे शाहूंचा विचार पुढे नेत आहेत. त्यांनी मराठा भवनसाठी शिवधनुष्य हाती घ्यावे. येत्या दोन वर्षांत त्याचे भूमिपूजन होईल, याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष घालू.’माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, ‘बहुजनांसाठी संघर्ष करण्याचा मुळीक यांचा पिंड वाखाणण्याजोगा आहे. ते हाडाचे कार्यकर्ते आहेत.
आमदार जयश्री जाधव यांनी मराठा भवनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी मुळीक यांनी चिकाटीने जनसमुदाय एकवटला असून, शाहूंचा विचार रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याचे सांगितले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी मुळीक हे उद्रेकातून तयार झालेले हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्यात संवाद कौशल्य व संघटन करण्याची हातोटी असल्याचे स्पष्ट केले.
इंद्रजित सावंत यांनी मुळीक यांनी विश्वासार्हता कमवली असून, ते एखाद्या विषयाचा अभ्यास करून पहाडासारखे लोकांच्या मागे उभे राहतात, असे सांगितले. आमदार प्रकाश आवाडे, अॅड. गुलाबराव घोरपडे, व्ही. बी. पाटील, संजय पाटील, कादर मलबारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सरलाताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संजय पाटील, अर्जुन आबिटकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. बबन रानगे यांनी प्रास्ताविक केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. संदीप देसाई यांनी आभार मानले.
शाहू विचार पेरुया...
शिव्या देऊन टाळ्या घेण्यापेक्षा शाहू विचार पेरुया, असे सत्काराला उत्तर देत मुळीक म्हणाले, ‘राष्ट्रपुरुषांचे विचार जातीत बंदिस्त होऊ नयेत, यासाठी काम करत आहे. समाजासाठी काम करताना पत्नीने खंबीरपणे साथ दिली. समाजात एखादी संकल्पना रुजवताना त्याची सुरवात घरापासून केली.’ मराठा भवनसाठी ३३ लाख रुपये जमा झाले असून, आयटी पार्क येथील पाच एकर जागेचा एकमेव प्रस्ताव आम्ही केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.