कोल्हापूर : बोगस मतदारांची नावे घुसडल्याचा संशय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

voters

कोल्हापूर : बोगस मतदारांची नावे घुसडल्याचा संशय

कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी बनविलेल्या मतदार यादीत २२६ हून अधिक सभासदांची बोगस नावे घुसडल्याचा संशय आहे. याबाबत तक्रार दाखल झाली असून अन्य दोन तक्रारी जिल्हा निबंधकाकडे दाखल होणार आहेत. बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडल्याने बोगस मतदार शोधून त्यांची नावे वगळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती शेतकरी सभासदांनी दिली आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कार्यक्षेत्रातील शेती पतसंस्था, बहुद्देशीय सहकारी संस्था, विविध कार्यकारी सेवा संस्थांचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य मतदार आहेत. त्यासोबत बाजार समितीतील नोंदणीकृत व्यापारी, अडत्यांही मतदानाचा अधिकार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या अखत्यारित बाजार समितीची निवडणूक होणार आहे. त्यासाठी तयारी झाली. मतदारांच्या याद्या झाल्या. यात बाजार समितीतील अडते, व्यापाऱ्यांच्या मतदारांची यादीही बाजार समितीने निवडणूक प्राधिकरणाला दिली.

यातील व्यापारी, अडते मतदारांच्या यादीविषयी काही सभासदांनी शंका उपस्थित केल्या. अडत्या किंवा व्यापारी म्हणून ज्यांनी बाजार समितीचे परवाना घेतले, त्यांना मतदार म्हणून ग्राह्य मानले जाते. मात्र काहींनी नातेवाईकांची नावेही दिली आहेत. त्या नातेवाईकांच्या नावे व्यापारी परवाना आहे की, नाही? याची माहिती नाही. बॅंक गॅरंटी, व्यापारी म्हणून व्यवसाय करीत असल्याचा दाखला, गुमास्ता परवाना अशा कागदपत्रांची पूर्तता नाही. बाजार समितीने केवळ सभासद वर्गणी भरून पावत्या दिल्या. या पावत्याच मतदार म्हणून यादीत नाव घालण्यासाठी आधार ठरल्याचे सांगण्यात येते.

यापूर्वी यादीत ४७२ नावे नियमबाह्य पद्धतीने घुसविल्याची तक्रार झाली होती. त्यानंतर ती नावे यादीतून वगळली होती. आगामी निवडणुकीत पुन्हा अशाच प्रकारे नाव घुसडली आहेत, असे काही सभासदांचे मत आहे, त्यानुसार जिल्हा निबंधकांकडे सोमवारी तक्रार दाखल करणार आहोत.’’

हेही वाचा: वानखेडेंच्या नावावर बार? क्रांती रेडकर मलिकांना म्हणाल्या, 'जबाबदार पदावर असूनही तुम्ही...'

नावे वगळण्यास मिळणार कालावधी

बाजार समितीची निवडणूक घेण्यापूर्वी ज्या सहकारी संस्‍थांचे संचालक हे निवडणुकीस मतदार आहेत. त्या सहकारी संस्‍थांच्या निवडणुका अगोदर घ्याव्यात. त्यानंतर बाजार समितीची निवडणूक घ्यावी, त्यामुळे कोणीही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाहीत. असे पत्रही राज्य शासनाच्या कार्यासन विभागाने दिले आहे. त्यानुसार बाजार समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्याच कालावधीत बोगस नावे कमी करण्यासाठी वेळ उपलब्ध आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

"बाजार समितीकडे जेवढे परवानाधारक आहेत. त्या परवानाधारकांची नावे मतदार यादीसाठी पाठवलेली आहेत. ज्यांचा दोन वर्षापूर्वीचा परवाना आहे, अशांची नावे गेली आहेत. बोगस नावे असल्याबाबतची तक्रार बाजार समितीकडे आलेली नाही.’’

- जयंवत पाटील, सचिव, बाजार समिती

"यंदाच्या निवडणुकीसाठी नियमबाह्य मतदारांची नावे यादीत घातल्याचा संशय आहे. असे काही सभासदांचे म्हणणे आहे. त्यानुसार जिल्हा निबंधकांकडे सोमवारी तक्रार दाखल करणार आहोत."

- ॲड. किरण पाटील, शेतकरी सभासद

loading image
go to top