
कोल्हापूर : विद्यार्थी दशेत वाहतूक नियमांचे धडे
कोल्हापूर : सहलीसह खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे दिले जाणार आहेत. पोलिस मुख्यालयातील अडीच वर्षे बंद असणारी ‘ट्रॅफिक गार्डन’ पुन्हा खुले झाले. शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून कारवाईसह विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जातात.
त्याच अनुषंगाने शालेय वयातच वाहतुकीच्या नियमांबाबत मुलांचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने पोलिस मुख्यालयात २०१८ मध्ये ट्रॅफिक गार्डन सुरू करण्यात आली. कोरोना संकटामुळे दोन ते अडीच वर्षे हे गार्डन बंद होते. त्यामुळे त्याची काहीशी पडझड झाली होती. ही गार्डन विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी, त्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी गार्डनच्या देखभाल दुरुस्तीसाठी पोलिस कल्याण निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ही गार्डन आता विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी सज्ज झाली आहे.
गार्डनमध्ये सिग्नल, चौक, वळण, बोगदा, झेब्रा क्रॉसिंगसह वाहतूक नियमांचे फलक लावले आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक सायकल उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यांना सायकलिंग करत खेळाच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांची ओळख करून दिली जाणार आहे. त्या नियमांचे पालन कसे करायचे, याची माहिती वाहतूक शाखेच्याच पोलिसांकडून दिली जाणार आहे. नियमांचे पालन न केल्याने अपघाताचे धोके याविषयीही माहिती दिली जाणार आहे. शेजारीच पोलिस गार्डनही आहे. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणारी ‘ट्रॅफिक गार्डन’ सज्ज झाली आहे. गार्डनला भेटी देण्याबाबत लवकरच शाळांशी संपर्क साधण्यात येईल.
- सत्यवान माशाळकर(राखीव पोलिस निरीक्षक).