Kolhapur : वाहतूक कोंडीने शहर घुसमटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur

Kolhapur : वाहतूक कोंडीने शहर घुसमटले

कोल्हापूर : सलग सुट्यांनंतर सुरू झालेली शाळा व शासकीय कार्यालये, रस्त्यावर अजूनही असलेले मंडप, खड्ड्यांनी भरलेले रस्ते आणि बेशिस्त पार्किंग यामुळे शहरात आज सकाळी अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शाहूपुरी, गवत मंडई, स्टेशन रोड, लक्ष्मीपुरी, भाऊसिंगजी रोड, व्हीनस कॉर्नर परिसरात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. ‘केएमटी’च्या बसेस सकाळच्या सत्रात बंद होत्या, अन्यथा मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असता.

शुक्रवारी अनंत चतुर्दशी, शनिवार व रविवारही शासकीय सुटी, यामुळे सरकारी कार्यालये सलग तीन दिवस बंद होती. काही शाळांनीही विद्यार्थ्यांना शुक्रवारी जोडून सुटी जाहीर केली होती. या तीन दिवसांच्या सलग सुटीनंतर आज शाळा आणि कार्यालयेही सुरू झाली. सकाळी दहापासूनच कार्यालयात, तसेच शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धांदल सुरू होती. त्यात बसेस बंद असल्याने बसने शाळेला जाणाऱ्या मुलांना सोडायला जाण्याची वेळ पालकांवर आली.

मंडप आणि खड्डे

अजूनही बहुतांश मंडळाचे मंडप रस्त्यावरच आहेत. काही प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रचंड साम्राज्य आहे आणि या सगळ्यावर कहर म्हणजे काही रस्त्यांवर बेशिस्त पार्किंग होते. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली. गोकुळ हॉटेल ते गवत मंडई, स्टेशन रोडवर दाभोळकर कॉर्नर ते असेंब्ली रोड, तर लक्ष्मीपुरीतील सर्वच मार्गांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शाहूपुरीतील अंतर्गत रस्त्यावरही वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळाली.

Web Title: Kolhapur Transportation Dilemma Illegal Parking Traffic Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..