
कोल्हापूर : रणरागिणींच्या गौरवातून नव्या पिढीला प्रेरणा
कोल्हापूर: कोल्हापूरला रणरागिणी ताराराणींचा आणि बेळगावला राणी चन्नम्मा यांच्या शौर्यशाली पराक्रमाचा इतिहास आहे. हाच वारसा येथील रणरागिणी आता सर्वच क्षेत्रांत नेटाने पुढे नेत आहेत. त्यांच्या यशकथा नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या असल्याचे गौरवोद्गार जीएसटी विभागाच्या सहआयुक्त सुनीता थोरात यांनी काढले. ‘सकाळ’च्या वतीने ‘वूमन इन्फ्लुएन्सर्स’ ॲवॉर्ड वितरणाचा दिमाखदार सोहळा बुधवारी हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार हॉलमध्ये रंगला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
सुनीता थोरात म्हणाल्या, ‘‘बातम्यांच्या पलीकडेही ‘सकाळ’ने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजातील विधायक गोष्टींना प्राधान्य देत लोकांच्या सहभागातून अनेक उपक्रम यशस्वी केले आणि संपूर्ण राज्याला आदर्श दिला. शिरोळमधील महापुरात जमीनदोस्त झालेल्या शाळांची पुन्हा उभारणी करणे असो किंवा काश्मीरमधील गाव दत्तक घेऊन त्याची पुन्हा उभारणी करणे असो, या गोष्टी नक्कीच कौतुकास्पद आहेत. महिलांसाठी ‘तनिष्का’सारखे व्यासपीठ निर्माण करून अनेक उपक्रम यशस्वी केले. ‘वूमन इन्फ्लुएन्सर्स’ ॲवॉर्डच्या निमित्ताने तर सर्वच क्षेत्रांतील रणरागिणींना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा केलेला गौरव सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.’’
‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेतील सोयराबाई, अभिनेत्री ऊर्मिला जगताप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ‘सकाळ’ नेहमीच समाजातील विधायक गोष्टींना प्रोत्साहन देतो. विविध सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकांच्या सहभागातून प्रयत्न करतो. एकूणच हा सारा प्रवास पाहिल्यास ‘सकाळ’ माध्यम समूह सामाजिक परिवर्तनाचे एक केंद्रच बनल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
‘केसरी’ फेम अभिनेता विराट मडके म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराजांनी महिला सन्मानासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष साजरे करत असताना होत असलेला हा पुरस्कार वितरणाचा सोहळा नक्कीच कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला आता कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत, याची साऱ्यांनाच प्रचीती आली आहे.’’
‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘सकाळ माध्यम समूह समाजातील विधायक बदलांसाठी आग्रही असून, त्यासाठी विविध उपक्रम राबवले आणि यशस्वी केले. विविध क्षेत्रांत आता महिला व मुलींनी पुरुषांच्याही पुढे जाऊन आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचा योग्य सन्मान व्हावा आणि त्याचबरोबर त्यांच्या यशकथेतून नव्या पिढीने आदर्श घेतला तर त्यांनाही आपापल्या क्षेत्रात करिअरसाठी वेगळी दिशा मिळेल, या उद्देशाने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले. महिला सन्मानासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणाऱ्या राजर्षी शाहूंच्या भूमीतील या सोहळ्याला यंदाच्या राजर्षी शाहू स्मृतिशताब्दी वर्षाची झालर लाभली आहे आणि ती सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे.’’
कार्यक्रमाला ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव, ‘स्मार्ट सोबती’च्या संपादक सुरेखा पवार, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) महेश डाकरे आदी प्रमुख उपस्थित होते. ऐश्वर्या बेहरे यांनी सूत्रसंचालन केले. रुद्रम बॅंडचे शुभम साळोखे, रोहित सुतार यांच्या बॅंडने कार्यक्रमालाप्रारंभ झाला.
कोल्हापूरच्या रणरागिणी
कोल्हापुरातील श्रीमंत सौ. मृगनयनाराजे एम. घाटगे, हसीना बाबू फरास, वैशाली राजेश क्षीरसागर, मौश्मी आवाडे, जयश्री महावीर गाट, मनीषा नितीन वाडीकर, स्निग्धा चेतन नरके, स्मिता चेतन माने, अनघा शक्तिप्रसाद भोसले, वैशाली धनाजी जाधव, अनु मोतीवाला, शीतल गजानन पोवार, रजनीगंधा रावसाहेब वंदुरे, वृषाली माळकर, रिटा संदीप सोनवणे, डॉ. अल्पना सोपान चौगुले, ज्योती मनोज जाधव, प्रतिमा विकास काशीद, शोभा किशोर तावडे, अँजेला रॉबर्ट नोरेंज, सारिका सागर बकरे, भाव्या पियूष सत्रा, ॲड. शिल्पा राजेश सुतार, रूपाली अण्णासो पाटील, आश्लेषा गुरुदत्त मुंगरवाडी, जयश्री नीरज झंवर, ज्योती विशाल पागडे, स्मिता अनिल पाटील, ॲड. नीता मगदूम, शिवानी विजयसिंह भोसले, अपूर्वा अनिरुद्ध जाधव-कसबेकर, स्मिता खामकर, प्राची दयानंद कणेकर, विद्या विलास पाटील, ज्योती महेश कांबळे यांचा गौरव करण्यात आला.
Web Title: Kolhapur Women Influencers Award Ceremony
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..