
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता येवून सहा महिने झाले. मात्र पदाधिकारी विश्वासात घेवून काम करत नाहीत. मनमानी पध्दतीने निधीवर डल्ला मारला जात आहे. आरोग्य समिती तर विश्वासात घेत नाही. पदाधिकारी सदस्यांना डावलून गुपचूप बैठका घेतात, असा तक्रारींचा पाढाच सदस्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर वाचला.
कोल्हापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या कानपिचक्या
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता येवून सहा महिने झाले. मात्र पदाधिकारी विश्वासात घेवून काम करत नाहीत. मनमानी पध्दतीने निधीवर डल्ला मारला जात आहे. आरोग्य समिती तर विश्वासात घेत नाही. पदाधिकारी सदस्यांना डावलून गुपचूप बैठका घेतात, असा तक्रारींचा पाढाच सदस्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर वाचला. यावर पदाधिकाऱ्यांचा सुरु असलेला कारभार अजिबात पसंत नाही. सदस्यांना विश्वासात घेवूनच काम केले पाहिजे. पुढील काळात कारभारात सुधारण झाली पाहिजे, असे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
सहा महिन्यापुर्वी जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आली. मात्र सत्तेत आल्यापासून कारभाराविषयी तक्रारी सुरु आहेत. सत्ताधारी सदस्यांची नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्किट हाऊस येथे मुश्रीफ यांनी बैठक घेतली. पालकमंत्री सतेज पाटील बैठकीस उपस्थित राहणार होते. मात्र ते बाहेरगावी गेल्याने त्यांच्या शिवाय ही बैठक पार पडली. या बैठकीस अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, स्वाती सासणे उपस्थित होत्या. ही बैठक सुमारे दोन तास चालली.
या बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे पदाधिकारी विश्वासात घेत नाहीत, सदस्य केबीनला आले की विषय बंद करतात तसेच एकमेकांच्यावर कुरघोडी करण्यासाठी उलटसुलट माहिती देतात, अशी तक्रारही करण्यात आली. यावर मंत्री मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांना कडक समज दिली. यावेळी झालेल्या चर्चेत शशिकांत खोत, अर्जुन आबीटकर, मनोज फराकटे, विजय बोरगे, पांडुरंग भांदिगरे, राजू भाटळे, विनय पाटील, विलास पाटील, अमर पाटील, सुभाष सातपुते,चेतन पाटील, सचिन बल्लाळ आदींनी सहभाग घेतला.
....
16 सदस्य अनुपस्थित
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. एकूण 43 सदस्य आघाडीत आहेत. मात्र यातील तब्बल 16 सदस्य अनुपस्थित होते. महत्वाचे म्हणजे पक्षप्रतोद उमेश आपटे , गटनेते युवराज पाटील यांच्यासह काही प्रमुख सदस्य या बैठकीस अनुपस्थित होते. अनेक सदस्य हे कोरोनामुळेही या बैठकीस उपस्थित राहिले नाहीत.
जेवणावळीकडे पाठ
सदस्यांना खूष करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या निवासस्थानी जेवणावळीचे आयोजन केले होते. बैठकीला आला नाहीतरी चालेल पण जेवणावळीस या, असे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र बैठकीस आलेल्या बहुतांश सदस्यांनी या जेवणावळीकडे पाठ फिरवली. त्यामुळे पदाधिकारी व सदस्यांमध्ये किती दिलजमाई झाली आहे, हे समजण्यासाठी काही वेळ वाट पहावी लागणार आहे.
शिक्षणाधिकारी, बिल्लेची बदली करा
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांची बदली करावी तसेच आरोग्य विभागात कार्यरत असलेले युवराज बिल्ले यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली. बिल्ले हे कधीच फोन उचलत नाहीत, सरळ उत्तरे देत नाहीत, असे सांगत बदलीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी मी लक्ष घालतो, असे ना.मुश्रीफ यांनी सांगितले.
Web Title: Kolhapur Zilla Parishad Padadhikars Bearers Earplugs
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..