साखर मिश्रीतमुळे कोल्हापुरी गुळाला बाधा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखर मिश्रीतमुळे कोल्हापुरी गुळाला बाधा?

साखर मिश्रीतमुळे कोल्हापुरी गुळाला बाधा?

कोल्हापूर : यंदाचा हंगाम तेजीत आला असताना काही उत्पादकांकडून साखर मिश्रीत गूळ बाजारात आणला जात आहे. त्यामुळे कोल्हापुरी गूळनिर्मिती करणाऱ्या उत्पादकांच्या गुळाला कमी दर मिळण्याचा धोका निर्माण झाला. विश्वासार्हतेला धक्का बसल्यास कोल्हापूर गुळाच्या लौकिकाला बाधा पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साखरमिश्रीत गुळाला पायबंद घालण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने पेच निर्माण झाला.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

शाहू मार्केट यार्डात येणारा कोल्हापुरी गुळाचा देशभरात लौकीक आहे. गुजरातमध्ये कोल्हापूरला चांगला दर देऊन हा गूळ खरेदी केला जातो. काही वर्षांत उत्तर भारतात गूळ उत्पादन वाढले. तेथील गूळ गुजरातमध्ये कमी किमतीत मिळू लागला; तर राज्यात मराठवाडा, कर्नाटक सीमा भागात गुळाचे उत्पादन वाढले. त्यामुळे कोल्हापुरी गुळाला स्पर्धा निर्माण झाली. तरीही कोल्हापुरी गुळाची गुजरातमधील मागणी कायम आहे.

येथील काही उत्पादक गूळ बनविताना त्यात साखर घालतात. साखरेमुळे गूळ कठीण होतो. लवकर खराब होतो. गोडीला जास्त असला तरी शुद्ध गुळासारखी चव येत नाही. रंगही पिवळा-पांढरा दिसतो. परिणामी, असा गूळ कोल्हापुरात खपला तरी गुजरात बाजारपेठेत त्याला भाव चांगला मिळत नाही. व्यापाऱ्यांचे नुकसान होते. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापुरात घाऊक बाजारात दर पडतात. दर पडला की ज्या शेतकऱ्याने शुद्ध गूळ बनवला आहे, त्याचा उत्पादन खर्च वाढतो. दर पडल्याने प्रामाणिक शेतकऱ्यांचे नुकसान होते. पाच वर्षांपूर्वी गुळात साखर घालण्याचे प्रमाण १०-२० टक्के होते. सध्या हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

आजअखेर गूळ आवक

  • ३० किलो गूळ रव्यांची आवक : ५ लाख ९४ हजार (सरासरी दर २८०० ते ३०५० रुपये)

  • १ किलो बॉक्स आवक : ७ हजार ६४९ (३००० ते ४०२५ रुपये)

  • कोल्हापुरी गूळ ठेवणीचा व उच्च गुणवत्तेचा आहे. परराज्यांत या गुळाला मागणी असते.

हेही वाचा: मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

"साखर घातल्याने गूळ जास्त काळ टिकत नाही. तेव्हा कोल्हापुरी गुळाच्या लौकिकाला बाधा पोचते. शासनाने गुळाला कुटीर उद्योगाचा दर्जा दिल्यास तसेच शाश्वत दर दिल्‍यास साखर टाकण्याचा प्रश्न उरणार नाही."

- भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, किसान मोर्चा

loading image
go to top