
Kolhapur Politics : माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतींसह २३ माजी नगरसेवकांनी आज मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये गेल्या सभागृहातील १४ नगरसेवकांचा समावेश आहे. यामुळे काँग्रेस, भाजप, ताराराणी आघाडीला खिंडार पडले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘मुक्ताई’ बंगल्यात रात्री आठच्या सुमारास हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येकाच्या गळ्यात शिवसेनेचा स्कार्प घातला.