
कोल्हापूर : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या संपात एसटी अधिकाऱ्यांनीही सहभागी व्हावे, अशी विनंती आज कर्मचाऱ्यांतर्फे केली. आजवर शांततेत आंदोलन सुरू असून संपात मार्ग काढण्यासाठी एसटी प्रशासनानेही सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही कर्मचाऱ्यांनी आज एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना केली, अशी माहिती कर्मचारी प्रतिनिधी उत्तम पाटील यांनी दिली.
१६ दिवसांपासून बस स्थानकावर एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. जिल्हाभरातील विविध आगाराचे चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी बस स्थानकावर दिवसभर ठिय्या करीत आहेत. आजही कर्मचारी आले. त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सायंकाळी विभाग नियंत्रक, वाहतूक अधिकारी, आगारप्रमुख यांची भेट घेऊन आम्ही संप शांततेने करीत असून अधिकाऱ्यांनीही संपात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र अधिकाऱ्यांना संपात सहभागी होण्यास मर्यादा असल्याचे सांगण्यात आले, कर्मचाऱ्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान एसटी महामंडळाच्या पुणे विभागाने काल शनिवारी एक शिवशाही गाडी पुण्याहून कोल्हापूराला सोडली. ४२ प्रवासी घेऊनही बस रात्री साडेदहा वाजता दाखल झाली. त्यानंतर १५ मिनिटात ही बस सहा प्रवासी घेऊन पुण्याच्या दिशेने धावली. असाच प्रकार पुण्यावरून आज आणखी गाड्या येण्याची शक्यता होती. मात्र कर्मचाऱ्यांनी काल संयम बाळगला आहे. आज पुन्हा अशी वाहतूक करून कर्मचाऱ्यांच्या भावनाशी खेळू नये, असे आवाहन एसटी कर्मचारी करीत होते, दिवसभर पुण्यावरून एकही गाडी आलेली नाही.
संपात सहभागी कर्मचाऱ्यांची एसटी प्रशासन गंभीर दखल घेत आहे. त्यानुसार निलंबन कारवाईचा बडगा अद्यापि उगारलेला आहे. राज्यात दिवसभरात १९७ व्यक्तींचे निलंबन झाले. कोल्हापुरात एकूण ५३ तर राज्यभरात २ हजार ९३७ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले. तर राज्यात ६१८ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली आहे. तर कोल्हापुरातील ३६ जणांचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
प्रवासी वाहतुकीला ‘खो’
एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही जिल्ह्यात एसटी सुरू आहे, राज्यात दिवसाला दीड-दोन हजार प्रवाशांची वाहतूक होतो. वास्तवीक एसटी महामंडळ एरव्ही रोज ६४ लाख प्रवाशांची वाहतूक करते मात्र संप काळात राज्यभरात फक्त २५ ते ३० गाड्या धावत आहेत. प्रशासनाच्या सूचनेनुसार गाड्या बाहेर काढल्या तरी पुढे कोणत्याही जिल्ह्यात त्या गाडीचा प्रवास संपकरी थांबवू शकतात. म्हणून प्रवासीही गाडीत बसत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाचे प्रयत्नही अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.