Kolhapur : कुंभी साखर कारखान्याचा विजय करवीर विधानसभेचे गणित बदलणार ?

करवीरचे राजकारण : करवीरमधील विरोधकांचे घटलेले मताधिक्य पथ्यावर
Kumbi-Kasari Sugar Factory election
Kumbi-Kasari Sugar Factory election sakal

कुडित्रे : गेल्या विधानसभेत पराभूत झालेल्या माजी आमदार चंद्रकांत नरके यांना कुंभी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयाने आगामी विधानसभेसाठी बळ मिळाले आहे. ‘कुंभी’च्या निवडणुकीतील बालेकिल्ला असलेल्या विरोधकांच्या भागात त्यांचे घटलेले मताधिक्य आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची साथ नरके यांच्या पथ्यावर पडल्याचे निकालावरून दिसते.

दरम्यान, ‘कुंभी’त सत्ता परिवर्तन होईल, विरोधी गटाच्या ८ ते १० जागा लागतील, असा अंदाज व्यक्त केला जात असताना संपूर्ण नरके पॅनेल विजयी झाल्याने सभासदांनी पुन्हा नरके घराण्यावर विश्वास दाखवला आहे. या निकालाने जिल्हा परिषद, पंचायत समितीसह लोकसभा, विधानसभेचेही संदर्भ बदलण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी नरके पॅनेलला थेट पाठिंबा नसला तरी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा अंतर्गत पाठिंबा होता. ‘आमचं ठरलंय’ असा संदेश त्यांनी निवडणुकीपूर्वी दिला होता. करवीर-गगनबावडा तालुक्यात नरके पॅनेलला मिळालेले मताधिक्य यातून श्री. पाटील यांच्या बळाचा पट श्री. नरकेंच्या मागे असल्याचे दिसते. दुसरीकडे श्री. नरके यांचे पारंपरिक विरोधक आमदार पी. एन. पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर श्री. नरके यांचे चुलते अरुण नरके, आमदार डॉ. विनय कोरे यांचा पाठिंबा मिळवला; पण त्यांचा करिष्मा कुठेच चालला नसल्याचे पन्हाळा, शाहूवाडीतून विरोधी आघाडीला मिळालेल्या मतांवरून स्पष्ट होते.

‘कुंभी’च्या कारभाराविरोधात विरोधकांनी जोरदार प्रचार केला; पण हा प्रचार परिवर्तन घडवू शकला नाही. सुरुवातीपासून विरोधी आघाडीच्या नेतृत्वाचा विषय गाजला. अखेर गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे यांना पॅनेल प्रमुख करण्यात आले. विरोधकांचे पॅनेल प्रबळ होते, यंत्रणाही सक्षम होती; पण गेल्या निवडणुकीतील करवीरमधील मताधिक्यही विरोधकांना टिकवता आले नाही. कारखान्यांवरील वाढलेले कर्ज, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, एफआरपी देताना झालेला तोटा यावर विरोधकांनी रान उठविले; पण हे आरोप विरोधकांना यश मिळवून देऊ शकले नाहीत.

राजकीय समीकरणे बदलणार...

कुंभी कारखाना निवडणुकीनंतर जिल्ह्यातील विविध निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र आहे. आमदार सतेज पाटील यांना राजाराम कारखान्यामध्ये आमदार पी. एन. पाटील यांनी साथ द्यावी, अशी अंतर्गत इच्छा होती. मात्र, याकडे आमदार पी. एन. पाटील यांनी कानाडोळा केला. कुंभीच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी थेट पाठिंबा न देता अंतर्गत पाठिंबा नरके पॅनेलला दिला. यामध्ये गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या परिसरात नरके पॅनेलला चांगले मतदान मिळाले.

ही एकी पुढे राहणार का ?

आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे, अरुण नरके कुंभी कारखाना निवडणुकीमध्ये एकसंध राहिले, तर चंद्रदीप नरके, सतेज पाटील एकत्र आले. आता पुढे राजाराम कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकींमध्ये नेत्यांची ही एकी राहणार का, यावर पुढची राजकीय समीकरणे ठरणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com