esakal | पारंपरिक लावणीची "कोल्हापुरी प्रतिभा' 
sakal

बोलून बातमी शोधा

lavani singer pratibha thorat bhosle

गायिका म्हणून स्वतःची ओळख सिद्ध करणाऱ्या प्रतिभा थोरात यांना लावणी या कलाप्रकाराबद्दल विशेष ओढ वाटते. महाराष्ट्राच्या या लोककलेतील मूल्य जपण्यासाठी योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे. 

पारंपरिक लावणीची "कोल्हापुरी प्रतिभा' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रामलीला, भवाई, नौटंकी या जशा भारतातील विविध प्रांतातील लोककला आहेत, तसा तमाशा हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध लोककलेचा प्रकार. तमाशा म्हणजे उघड्यावर सादर केलेला देखावा. लावणी हा त्याचाच एक भाग. लावणीची पाळेमुळे आपल्याकडे फार खोलवर रुजली आहेत. पूर्वी, गण-गौळण, वग, भारुड अशा प्रकारांतून तमाशा सादर केला जात असे व लावणी हा त्यातील एक भाग असे; मात्र काळाच्या ओघात लावणी या कलाप्रकाराला पसंती मिळत गेली व महाराष्ट्रात लावणीची मोठी परंपरा निर्माण झाली. अनेक चित्रपटांमधून लावण्या दिसू लागल्या. मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ या लावण्यांनी चांगलाच गाजवला. लावणी नृत्यप्रकार सादर करण्याबरोबरच लावणी गाणाऱ्यांचीही मोठी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली. रोशन सातारकर, लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले, सुलोचना चव्हाण अशा अनेक ज्येष्ठ गायिकांनी मराठीत लावण्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. 
लावणी हा लोककलेचा प्रकार असल्याने लोकांचा प्रतिसाद त्यात महत्त्वाचा असतो; मात्र गेल्या काही वर्षांत विचित्र हावभाव, लकबी यांनाच लावणीमध्ये अधिक पसंती मिळू लागली. गायनातही तसेच प्रयोग होऊ लागले. त्यानंतर तर लावणी म्हणजे आयटम सॉंग अशी संकल्पना दृढ होऊ लागली. लावणीच्या या बदलत्या प्रवासाबाबत स्वतः लावणी गाणाऱ्या प्रतिभा थोरात चिंता व्यक्त करतात. 

प्रतिभा थोरात या मूळच्या कोल्हापूरच्या, माहेरच्या प्रतिभा भोसले. त्यांच्या घरात तसा संगीताचा वारसा नव्हता; मात्र गाण्याची त्यांना आवड होती. त्यांचे आजोबा राजकवी होते, तर आईला संगीताची आवड होती. कोल्हापूरच्या असल्यामुळे लावण्यांची आवड घरात रुजलेली होती. आईही लावण्या गात असे. त्यामुळे लावणीवर त्यांचे लहानपणापासूनच प्रेम जडले. त्यात ज्येष्ठ कवी जगदीश खेबूडकर हे मराठीचे शिक्षक म्हणून लाभले होते. त्यामुळे लहानपणीच मराठीचा पाया पक्का झाला. या संस्कारांतूनच पुढे गायनात काही तरी करण्याची इच्छा निर्माण झाली. 

सोशयॉलॉजीमध्ये एम.ए. करूनही लग्नानंतर त्या गायनाच्या क्षेत्रात स्थिरावल्या. लग्नानंतर पुण्यात आल्यामुळे नवे गाव, नवा परिसर आजूबाजूला होता. त्यात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी त्यांनी आधी गाण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. उत्साद फैय्याज हुसैन खॉं यांच्याकडे सध्या त्यांचे शिक्षण सुरू आहे. त्याशिवाय प्रसिद्ध संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यातील प्यारेलालजी यांच्याकडेही त्या शिक्षण घेतात. केवळ लावणीच नाही तर भावगीत, भक्तिगीतेही त्यांनी आजवर सादर केली आहेत. एक वर्षापूर्वी त्यांचा एक लावणीचा अल्बम "मी मिरची कोल्हापूरची' प्रकाशित झाला. ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांनी त्यांची खूप प्रशंसा केली. या अल्बममध्ये एकूण नऊ लावण्या असून जयंत भिडे व स्नेहसुधा कुलकर्णी यांनी त्या लिहिल्या आहेत. हा अल्बम कोल्हापुरात प्रकाशित झाला असून, पुणे व मुंबईत तो लवकरच प्रकाशित करण्याचा त्यांचा विचार आहे. 

लावणी हा लोकसंगीताचा वेगळा, ठसकेबाज प्रकार आहे. लावणीला समाजात मानाचे स्थान मिळवून देण्याची गरज असल्याचे त्यांचे मत आहे. चित्रपटांची गाणी व इतर संगीताच्या अल्बममुळे लावणी हा प्रकार दुर्लक्षिला जात आहे. लावणी सादर करण्याकडे आजकाल कल वाढला आहे. लावण्यांचे कार्यक्रम सादर होतात; मात्र लावण्यांच्या विशिष्ट गायकीकडे लक्ष दिले जात नाही, अशी खंत त्यांना वाटते. लावणीला मान देणे हे कलावंतांच्या हातात आहे, त्यामुळे आपणच त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांना वाटते. सध्या अनेक नवीन गायक, गायिका संगीताच्या क्षेत्रात आहेत; मात्र लावणी गाण्याचा विशेष प्रयत्न कोणीच करत नाही, याबद्दल त्या खंत व्यक्त करतात. सिनेमाच्या माध्यमातून काही लावण्या सादर केल्या जातात; मात्र त्या फारशा प्रभावशाली ठरत नाहीत. संगीतावर-शब्दांवर अजून काम केले, तर लावणी छान रंगेल. लावणी जपण्याचा प्रयत्न विविध माध्यमांतून होणे गरजेचे आहे, असे त्यांना वाटते. लावणीचे बिभत्स रूप जगासमोर न येता, त्यातील ठसकेबाजपणा जपला जावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्या सांगतात. 

लावणीव्यतिरिक्त दोन मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गायन केले आहे. "अति केलं मातीत गेलं' हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. या चित्रपटात सोलो लावणी त्यांनी गायली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या "हेडलाइन' या चित्रपटात एक पब सॉंग त्यांनी गायलं आहे. लवकर त्यांचा आणखी एक चित्रपट येतो आहे. "दगडाबाईची चाळ' असे या चित्रपटाचे नाव असून, त्यात आदर्श शिंदे यांच्याबरोबर प्रतिभा थोरात यांचे एक गाणे रसिकांना ऐकायला मिळेल. गेली चौदा वर्षे गाण्यात करिअर करणाऱ्या प्रतिभा थोरात यांना पुणे आयडॉल हा पुरस्कार मिळाला आहे. सहकुटुंब जाता येईल, अशी लावणी झाली पाहिजे असे त्यांना वाटते. या कलाप्रकाराला जपण्याचा व त्यात वैविध्य आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी शासनासह सर्वांनीच मिळून काम करण्याची गरज त्या व्यक्त करतात. 

ज्याप्रमाणे भाताची लावणी केली जाते, त्याप्रमाणे अक्षर-शब्दांची जोडणी करून त्याला संगीताचा साज चढवून सादर होणारी लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्याला जपण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिभा थोरात यांच्या प्रयत्नांना निश्‍चितच दाद द्यावी लागेल.