
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गाव गेल्या ४० वर्षांपासून ‘महादेवी’ उर्फ ‘माधुरी’ या हत्तीणीच्या प्रेमात आहे. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात राहणारी ही हत्तीण जैन समाज आणि गावकऱ्यांच्या हृदयात अढळ स्थान मिळवून होती. ती मठाची स्नेही, धार्मिक प्रतीक आणि गावाच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग होती. पंचकल्याण पूजा, मिरवणुका आणि धार्मिक सोहळ्यांमध्ये तिच्या शांत आणि शिस्तबद्ध स्वभावाने सर्वांना भुरळ घातली होती. आचार्य विशुद्ध सागर महाराजांनीही तिच्या सेवेचे कौतुक केले होते.