टीव्ही इंडस्ट्रीला कोल्हापूरची भुरळ; जिल्ह्यात सहा मालिकांचे शूटिंग

दिवाळीनंतर आणखी एक नवी मालिका
kolhapur
kolhapursakal media

कोल्हापूर : चित्रपटसृष्टीचे माहेरघर म्हणून लौकिक असलेल्या जिल्ह्यात आता शूटिंग पुन्हा बहरले असून, तब्बल सहा मालिकांचे शूटिंग एकाच वेळी सुरू राहणार आहे. चित्रनगरीसह जिल्ह्याच्या विविध भागांत एकाच वेळी सध्या पाच मालिकांचे शूटिंग सुरू असून, नोव्हेंबरमध्ये आणखी एक नवी मराठी मालिका येथे येणार आहे. एकाच वेळी सहा मालिकांचे शूटिंग होण्याची ही पहिलीच वेळ असेल. एकूणच मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक असणाऱ्या टीव्ही इंडस्ट्रीला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर येथील विविध लोकेशनची भुरळ पडली आहे. साहजिकच दोन वर्षांनंतर स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.

कोरोनापूर्वी शहर आणि परिसरात केवळ दोनच मालिकांचे शूटिंग सुरू होते; पण गेल्या दीड वर्षाचा विचार करता या दोन्ही मालिका बंद झाल्या. दुसऱ्या लॉकडाउनपूर्वी ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिका सुरू झाली; पण पुढे लॉकडाउनमुळे तीही बंदच झाली. पहिल्या लॉकडाउननंतर मुंबई, पुण्यातील शूटिंग प्रोजेक्ट कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्यातून एक हिंदी आणि दोन मराठी मालिकांचे शूटिंग येथे सुरू झाले.

दरम्यान, दुसऱ्या लॉकडाउनमुळे या मालिका परराज्यात गेल्या; पण कोरोना नियम शिथिल होताच त्या पुन्हा येथे आल्या. त्याचबरोबर आणखी चार नव्या मालिकांचे शूटिंग येथे सुरू झाले आहे. ‘मेहंदी है रचनेवाली’ या हिंदी मालिकेबरोबरच ‘शेगावीचे संत गजानन’ या मराठी मालिकेचे शूटिंग सध्या चित्रनगरीत, तर ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेचे तामगाव, पाचगाव परिसरात शूटिंग सुरू आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण टीम कोल्हापूरची आहे. महेश तागडे, जितेंद्र गुप्ता निर्माते असून, अजय कुरणे दिग्दर्शक, तर रवी गावडे प्रॉडक्शन हेड आहेत. वैशाली घोरपडे कार्यकारी निर्मात्या आहेत. याच महिन्यात वसगडे परिसरात ‘आभाळाची माया’ आणि हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील विविध लोकेशन्ससह सांगली परिसरात ‘सुंदरी’ या मालिकेच्या शूटिंगला प्रारंभ झाला आहे.

दृष्टिक्षेपात शूटिंग...

  • एका मालिकेच्या निमित्ताने किमान ६० जणांना, तर चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने किमान १०० जणांना रोजगार

  • लवकरच बॉलिवूडच्या बिग बजेट बॅनर्सची कोल्हापुरात शूटिंगसाठी एंट्री

  • चित्रपटांपेक्षा मालिकांच्या शूटिंगमुळे किमान वर्षापासून ते चार वर्षांपर्यंत कायमस्वरूपी रोजगाराची संधी

  • स्थानिक निर्मात्यांकडूनही आता ‘सुपर विठ्ठल’, ‘शिवायन’ चित्रपटांची निर्मिती

"कोल्हापुरातील कलाकार व तंत्रज्ञांसाठी ही चांगली संधी असून, काही मालिकांसाठी सहकलाकार मिळत नसल्याचेही चित्र सध्या निर्माण झाले आहे. येत्या काळात नक्कीच येथील कलाकारही लीड रोलमध्ये दिसतील."

- जितेंद्र पोळ, अभिनेता

"पहिल्यांदाच इतक्या संख्येने मालिकांचे शूटिंग येथे सुरू आहे. येत्या काळात आणखी काही प्रोजेक्ट शूटिंगसाठी येणार असून, स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत."

- मिलिंद अष्टेकर, निर्मिती व्यवस्थापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com