महात्मा फुलेंच्या साहित्याचे नवे खंड आता हिंदी, इंग्रजीतही 

Mahatma Phule Jayanti Special article information by dr pramod farande kolhapur marathi news
Mahatma Phule Jayanti Special article information by dr pramod farande kolhapur marathi news

कोल्हापूर : आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार महात्मा फुले यांच्या साहित्याचे नवे खंड हिंदी, इंग्रजी भाषेतही उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या महात्मा फुले प्रकाशन समितीतर्फे खंडांचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे प्रकाशन होणार आहे. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेला पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म, स्फुट लेखन, तसेच कविता इंग्रजीमध्ये तीन खंडांमध्ये येत आहे. यापूर्वी हिंदी भाषेत प्रकाशित झालेले महात्मा फुलेंचे साहित्य सध्या आऊट ऑफ प्रिंट झाल्याने त्या चार खंडांसह नवे दोन खंडही अभ्यासकांना उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर मराठीतील दुर्मिळ साहित्यही पुनर्मुद्रित केले गेले आहे. 

महात्मा फुलेंनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या वैश्‍विक मूल्यांची शिकवण दिली. त्यांचे विचार व्यक्तिगत जीवनाबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातही दिशादर्शक आहेत. सामाजिक चळवळींना महात्मा फुलेंचे विचार प्रेरणास्रोत आहेत. त्यामुळे महात्मा फुलेंच्या साहित्याला देशभरातून मागणी असते. त्यांचे साहित्य आतापर्यंत 9 वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. अभ्यासकांच्या मते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर सुमारे एक हजारांहून अधिक पुस्तके, ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

फुले यांच्या साहित्याचे मोल लक्षात घेऊन शासनातर्फेही महात्मा फुलेंचे साहित्य प्रकाशित होत असते. त्यासाठी ज्येष्ठ संशोधक, अभ्यासकांची, सदस्यांची समिती सरकार स्थापन करीत असते. या समितीतर्फे आता हिंदी, इंग्रजीतही नवे खंड प्रकाशित होत आहेत. यापूर्वी गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, महात्मा फुलेंचे निवडक साहित्य याचे इंग्रजीत भाषांतर झाले आहे; मात्र आता ते आऊट ऑफ प्रिंट झाल्याने त्या साहित्यासह छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म, स्फुट लेखन, कविता आदी साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहे. हिंदी भाषेतील आऊट ऑफ प्रिंट झालेल्या चार खंडांसह आणखी दोन नवे खंड पूर्ण झाले आहेत. मराठी भाषेतील नारायण बाबाजी पानसरे यांचे "महात्मा फुले यांचे अमर जीवन', गं. बा. सरदार यांचे "महात्मा फुले व्यक्ती आणि विचार', "शोधांच्या नव्या वाटा' असे दुर्मिळ आणि मौलिक संदर्भग्रंथ शासनाच्या महात्मा फुले प्रकाशन समितीतर्फे प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. 


पानसरेंनी लिहिलेले चरित्रही मिळणार 
कोल्हापूरचे कॉम्रेड दिवंगत गोविंद पानसरे यांचे नारायण बाबाजी पानसरे हे पणजोबा. ते महाधट पाटील याना नावानेही ओळखल जात होते. महात्मा फुलेंचे ते जवळचे मित्र, स्नेही होते. त्यांनी "महात्मा फुले यांचे अमर जीवन' हे फुलेंचे पहिले चरित्र लिहिले होते. 1891 मध्ये ओतूरला सावित्रीबाई फुले यांच्याहस्ते त्याचे प्रकाशित झाले होते. या चरित्र ग्रंथाआधारे महात्मा फुले यांची 11 एप्रिल ही जन्म तारीख शोधण्यात आली. हे दुर्मिळ आणि मौलिक चरित्रही शासनाच्या प्रकाशन समितीतर्फे पुन्हा उपलब्ध होणार आहे. 

महात्मा फुले यांच्या साहित्याला वैश्‍विक मूल्य आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्याला मागणी असते. महात्मा फुलेंच्या साहित्याचे हिंदी, इंग्रजी भाषेतील खंडांचे काम पूर्ण झाले आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे समग्र वाङ्‌मयही नव्या स्वरुपात येत आहे. ज्यांच्याकडे आधीचे समग्र वाङ्‌मय आहे त्यांच्यासाठी नवी माहिती पुरवणी स्वरुपात उपलब्ध असणार आहे. 
- प्रा. हरी नरके, सदस्य सचिव, महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती.  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com