esakal | मराठा आरक्षणासाठी पुन्हा आर-पारची लढाई; शुक्रवारी शिवाजी चौकात धरणे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा आरक्षणासाठी पुन्हा आर-पारची लढाई

मराठा आरक्षणासाठी पुन्हा आर-पारची लढाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) पुन्हा आर-पारच्या लढाईचा निर्धार व्यक्त करताना शुक्रवारी (ता.२८) छत्रपती शिवाजी चौकात (Chhatrapati Shivaji Chowk)धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत झाला. आरक्षणासाठी राज्य शासनाने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे अशीही मागणी यावेळी झाली. शिवाजी पेठेतील शिवाजी तरूण मंडळात ही बैठक झाली. धरणे आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. (Maratha-reservation-agitation-at-Shivaji-Chowk-on-Friday-kolhapur-news)

मराठा आरक्षणावर निर्णयासाठी राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलवावे, निर्णय होईपर्यंत समाजातील मुलांना शैक्षणिक सवलती द्याव्यात आदी मागण्या यावेळी झाल्या. त्याशिवाय लवकरच वकिलांची परिषद घेवून कायदेशीर लढाईसाठीही सज्ज राहण्याचा निर्णय बैठकीत झाला. बैठकीला शिवाजी तरूण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, ॲड, अशोकराव साळोखे, चंद्रकांत यादव,देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, ॲड. बाबा इंदूलकर, बाळ घाटगे, निवास साळोखे, सुरेश जरग, श्रीकांत भोसले, किशोर घाटगे, संदीप मोहिते, दिलीप देसाई, राजू सावंत.चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा- रोहिणीचा पेरा अन् मोत्याच्या तुऱ्यासाठी शेतकऱ्यांची धांदल

दिलीप देसाई म्हणाले, ज्या नियुक्ती रखडल्या आहेत अशांना तातडीने नियुक्ती पत्रे द्यावीत. ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजातील विद्याथ्यार्ना सवलती द्याव्यात .चंद्रकांत यादव यांनी पन्नास टक्यांची मर्यादा ओलांडयाची झाल्यास लोकसभेला सर्वाधिकार आहेत. असे नमूद केले. ॲड. इंदूलकर यांनी इंदिरा सहानी खटल्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. जे निकष अन्य समाजासाठी लावले जातात त्याचा आधार मराठा समाजासाठी आरक्षण देताना लावायला हवा. मागील चुकांची दुरूस्ती करणे आता पुढे जाणे आवश्‍यक आहे. तुर्तास पन्नास टक्यांच्या निकषात आपण बसू शकत नाही. आरक्षणाचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे विधिज्ञांशी चर्चा करून पुढील भुमिका ठरवावी लागेल.

बाळ घाटगे म्हणाले, आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली आता मराठ्यांनी आपली व्होट बॅंक तयार करावी, ॲस्टॉसिटीचा कायदा दबावतंत्रामुळे रद्द झाला. असाच दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. संसदेचे दोन्ही सभागहांना सर्वाधिकार आहेत. जयकुमार शिंदे यांनी शांततेच्या मार्गाने आरक्षण मागण्याचे दिवस संपले आहेत. आमदार खासदारांच्या दारात शंखध्वनी केल्याशिवाय त्यांना आंदोलनाची तीव्रता कळणार नाही. राजू सावंत यांनी अभ्यासगट नेमावा अशी सूचना केली.

महेश जाधव म्हणाले,. मराठा आरक्षणात राजकारण येता कामा नये, सर्वानी एकत्रित येऊन आर पारच्या लढाईला सामोरे जाऊया, वकिलांची परिषद असो अथवा कायदेशीर पातळीवर आरक्षण टिकण्यासाठी जे करता येईल ते आपण करूया असे आवाहन केले. सुजित चव्हाण यांनी पहिल्यांदा शांततेच्या मार्गाने आंदोन करू, ज्यावेळी पेटवायची वेळ येईल त्यावेळी ती ही भुमिका आपल्याला घ्यावी लागेल. आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी धरणे आंदोलन करणार आहोत.