esakal | लॉकडाउनचा असाही लाभ, बाजार समितीला मिळतोय उत्पन्नाचा नवा स्रोत
sakal

बोलून बातमी शोधा

The Market Committee Is Getting A New Source Of Income Kolhapur Marathi News

गेल्या पंधरवड्यात लॉकडाउनमुळे गडहिंग्लज बाजार समितीच्या आवारात भाजीपाला खरेदी-विक्रीला सुरुवात झाली. लगतच्या कर्नाटकातील भाजीपाल्याचे व्यवहार बंद असल्याने आजरा आणि चंदगड परिसरातील विक्रेते आणि शेतकरी बाजार समितीत येऊ लागले आहेत.

लॉकडाउनचा असाही लाभ, बाजार समितीला मिळतोय उत्पन्नाचा नवा स्रोत

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : गेल्या पंधरवड्यात लॉकडाउनमुळे बाजार समितीच्या आवारात भाजीपाला खरेदी-विक्रीला सुरुवात झाली. लगतच्या कर्नाटकातील भाजीपाल्याचे व्यवहार बंद असल्याने आजरा आणि चंदगड परिसरातील विक्रेते आणि शेतकरी बाजार समितीत येऊ लागले आहेत. या माध्यमातून शेतकरी आणि विक्रेत्यांच्या मदतीतून बाजार समितीला नवा उत्पन्नाचा स्रोत सुरू होऊ शकतो. यासाठी समितीच्या प्रशासनाने सुविधा देऊन पुढाकार घेण्याची आवश्‍यकता व्यक्त होत आहे. 

अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करणारी येथील बाजार समिती सीमाभागातील सर्वात मोठी आहे. गूळ, मिरची आणि जनावरांच्या बाजारासाठी ही बाजार समिती ओळखली जाते. गेल्या दोन दशकांत आवक कमी झाल्याने बाजार समितीची उलाढाल मंदावली आहे. गेल्या दशकभरात तर तोट्याचा भार सहन करीतच बाजार समितीचा कारभार सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून गुळाचे सौदे बंद असल्याने हमखास उत्पन्न बंद आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनामुळे जनावरांचा बाजारही ठप्प आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे बाजार समितीच्या सुमारे 25 कर्मचाऱ्यांना गेल्या दहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. 

राज्यातील सर्व बाजार समित्यांत भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. पूर्वी येथील विक्रेते भाजीपाल्यासाठी कर्नाटकातील घटप्रभा, संकेश्‍वर, बेळगाव या केंद्रांवर अवलंबून होते. त्यामुळे किरकोळ स्वरुपातील व्यवहार शहरातच होत होते. गेल्या दीड दशकात तालुक्‍यासह उपविभागात झालेल्या पाटबंधारे प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. स्थानिक गरज भागवून कोकण आणि गोव्यातही रोज भाजीपाला येथून पाठविला जातो. भाजीपाल्याच्या खरेदी विक्रीसाठी सहकारी तत्त्वावर दोन संघ आहेत.

पालिकेने कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी भाजी मंडई बंद ठेवून शहरात 23 ठिकाणी विक्री केंद्रे सुरू केली. त्यामुळेच सौद्यासाठी बाहेरील विक्रेते आणि शेतकऱ्यांनी बाजार समितीचे आवार गाठले. बाजार समितीतील रात्रपाळीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन विक्रेते आणि शेतकऱ्यांची सोय केल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यात केवळ जागा भाडे म्हणूनच विक्रेते आणि शेतकऱ्यांतून नाममात्र कर घेतला. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत विक्रेते आणि शेतकऱ्यांना अधिक सुविधा दिल्यास समितीला यातून कायमस्वरुपी अधिक उत्पन्न मिळणे सहज शक्‍य आहे. 

बाजार समितीच्या जमेच्या बाजू 
- विस्तीर्ण मोकळा परिसर 
- पाण्याची सोय 
- वाहनाच्या पार्किंगसाठी मोठी जागा 
- विक्रेते शेतकऱ्यांसाठी निवाऱ्याची सोय 
- समितीचे आवार मुख्य मार्गावर

loading image
go to top