esakal | तब्बल १७ वर्षानी घुमणार शड्डूचे आवाज...
sakal

बोलून बातमी शोधा

massive wrestling ground for shiv jayanti 2019 kolhapur marathi news

पोहाळेत तब्बल  १७ वर्षानंतर जोर बैठका उड्या अन् शड्डूचे आवाज घुमणार आहेत. 

तब्बल १७ वर्षानी घुमणार शड्डूचे आवाज...

sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : पोहाळेत तब्बल  १७ वर्षानंतर जोर बैठका उड्या अन् शड्डूचे आवाज घुमणार आहेत. या गावातील काही पैलवान व  तरुणांनी मनात निश्चय केला आणि पोहाळेतील बंद असलेली हनुमान तालीम पुन्हा सुरु केली आणि बघता बघता या तालमीत तरुण मुले  लाल मातीत  कुस्तीचा सराव करू लागली आहेत.

पोहाळे व परिसरात कुस्ती कायम राहावी यासाठी प्रथमच यावर्षी शिवजयंती निमित्त भव्य कुस्ती मैदान आयोजित केले आहे. यामध्ये  २५ ते ७० किलो वजन गटाच्या  मुले व मुलींच्या कुस्ती मैदान बुधवारी( ता. १९ ) सांयकाळी होत आहे.
कोल्हापूर ची कुस्ती ही  जगभरात प्रसिध्द आहे. मोबाईल , इंटरनेट मुळे तालमी व मल्लांची संख्या कमी-कमी होत गेली.  काही ठिकाणी या तालीम ओस पडू लागल्या, काहींची मोठी दुरावस्था झाली . मुलांना कुस्ती खेळण्यास प्रोत्साहन देण्याऐवजी लोक प्रतिनिधी व  तालीम पदाधिकाऱ्यांनी कुस्ती आखाडे मोडीत काढले.

हेही वाचा- अबब... ७४ वर्षाचा कॉलेज कुमार पाहिलात का?

१७ वर्षानंतर जोर बैठका उड्या अन् शड्डूचे आवाज घुमणार

आमदार, खासदार फंडातून मिळालेल्या निधीतून तालीम आखाड्याच्या ठिकाणी टोलेजंग  हॉल इमारती झाल्या. तालीम संस्थांत रस्सा मंडळे, राजकीय बैठकांसाठी  केंद्रे बनली होती. याला फाटा देत पोहाळे येथील जि.प. प्राथमिक शिक्षक भीवाजी काटकर यांनी पैलवान सुरज मोटे, सतिश चौगले, बाबासाहेब पोवार यांच्या सहकार्यांने पोहाळेत बंद पडलेली तालीम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि तो आमलात आणला . तालीम सुरू करून  गावातील लहान मोठे चाळीस पैलवान या तालमीत सध्या सराव करू लागले आहेत . सांयकाळी तर शडूचे आवाज घुमत आहेत.  

हेही वाचा- मुख्यमंत्री ठाकरेंची शिवराजेश्‍वर मंदिरास भेट

गावातील तरुणाईला एकत्र करुन कुस्तीचे धडे
दरम्यान, भीवाजी काटकर हे समर्थ तरुण मंडळाचे कार्यकर्ते असून ते केदारर्लिंग तालीमत घडले. त्यांना वस्ताद मारुती कुंभार यांनी कुस्ती व कसरतीचे धडे दिले. श्री. काटकर यांना कुस्तीची प्रचंड आवड असल्याने त्यांनी अगदी बालपणापासून विविध ठिकाणी कुस्तीचे मैदान गाजविले आहेत. याच छंदातून त्यांनी गावातील तरुणाईला एकत्र करुन कुस्तीचे धडे देण्यास सुरु केले आहे. यामध्ये सुरज मोटे, सतिश चौगले, बाबासाहेब पोवार, उदय भोसले, प्रथमेश साळोखे, उदय पोवार, आकाश पोवार, उदय निकाडे, रुपेश साळोखे, अनिकेत ढोले, हर्षद पाटील, केदार कोले, बळवंत बोरचाटे, विनायक बोरचाटे, यश पोवार यांच्यासह 40 तरुण कुस्तीचे धडे घेतात.

हेही वाचा- दिव्यांग रिदमने घेतली फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी

पोहाळे येथील हनुमान तालीम येथे पूर्वी अनेक मल्ल घडले आहेत. पोहाळेत कुस्ती मल्ल भीमराव बोरचाटे, रंगराव खुळे, कोंडीराम बोरचाटे, बाळासाहेब गुरव, रंगराव पोवार, रंगराव बोरचाटे, शहाजी पोवार, ज्ञानू बोरचाटे, सागर डबाणे, शामराव बोरचाटे, अर्जुन कांबळे, संभाजी मोटे, मधुकर पाटील, तानाजी बोरचाटे, संभाजी बोरचाटे, आनंदा पाटील, कृष्णात इंगळे, रघुनाथ मेथे, विश्वास साळोखे, सौरभ उन्हाळे यामल्लांनी पूर्वी भागात कुस्ती गाजविले आहेत. बंद असणाऱ्या तालमी पुन्हा सुरू झाल्याने गावात आता पुन्हा नव्याने मल्ल घडणार आहेत . तसेच त्यांचे कुस्तीबरोबर चांगले अरोग्य घडणार आहे.


आरोग्यासाठी कुस्ती हा एकच मंत्र
पालकांचे मुलांच्या अरोग्याकडे लक्ष नाही. ज्या वयात मुलांची वाढ होते त्या वयातच टि व्ही  मोबाईल मुळे त्यांचे डोळे खराब होत आहे . डोक्याला ताण येत आहे .एकूणच आरोग्याच्या  समस्या निर्माण होत आहेत . या सर्वातून बाहेर पडण्यासाठी व त्यांचे चांगले आरोग्य घडविण्यासाठी कुस्ती हा एकच मंत्र आहे. म्हणून आम्ही  गावात बंद पडलेली तालीम सुरू करून मुलांना कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.
 
भिवाजी काटकर ,प्राथमिक शिक्षक व पैलवान, प्रशिक्षक पोहाळे तर्फ आळते