esakal | दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव; तासात झालं होत्याचं नव्हतं
sakal

बोलून बातमी शोधा

menoli

दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव; तासात झालं होत्याचं नव्हतं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कडगाव (कोल्हापूर) : रात्री साडेदहाची वेळ... घरातील इतर सदस्य झोपले होते... मी टीव्ही बघत होतो... तेवढ्यात तरकरवाडी येथील तानाजी खोत यांनी फोनवर मेघोली तलाव फुटल्याची माहिती दिली आणि अवसानच गळालं. घरातून बाहेर येतोय तर पाण्याचा प्रवाह आणि त्याच्या आवाजाने भीतीने गाळण उडाली... अंधारात कुटुंबासह पळत सुटलो, दैव बलवत्तर म्हणूनच वाचल्याचे निवृत्ती शिवा मोहिते यांनी सांगितले. याचा सर्वात मोठा फटका बसला, तो मोहिते कुटुंबीयांना.  निवृत्ती शिवा मोहिते व धनाजी मोहिते यांचे घर उद्‍ध्वस्त झालं. प्रापंचिक साहित्य,  भांडीकुंडी प्रवाहाबरोबर वाहत गेली.

ते म्हणाले, ‘‘मुलगा, पत्नी, मुलगी माझ्यासोबत होते. अंधारातून पळत असतानाच पाणी वाढले. पत्नी भयभीत झाली. मुलाला उचलून कसेबसे बाहेर पडलो. या प्रवाहांमध्ये एक बैल, चार म्हशी मृत्युमुखी पडल्या, याचं दुःख आहे. तासात होत्याचं नव्हतं झालं.’’

धनाजी मोहिते यांचीही स्थिती अशीच. धरण फुटल्याचं समजताच म्हणून मुलगा नामदेव, आई जिजाबाई सोबत चार मित्रांसह ते गोठ्याकडे धावले. जनावरांना सोडलं; पण तोपर्यंत वेगवान पाण्याचा लोंढा घरात घुसला. अंधाऱ्या रात्री काहीच समजले नाही. मुलगा नामदेव आईला ओरडून मागे पाठवण्याचा प्रयत्न करत होता.

हेही वाचा: ...म्हणून फुटले मेघोली धरण ; पाच गावांना बसला मोठा फटकाच

नामदेव म्हणाले, ‘‘आम्ही प्रवाहाच्या वेगाने धावत होतो. क्षणार्धात प्रवाहाने गाठलं. आम्ही चारही मित्र अंधारात वेगवेगळ्या ठिकाणी वाहून गेलो. दैव बलवत्तर वेगवेगळ्या झाडांचा आधार घेऊन आम्ही लोंबकळत राहिलो. तब्बल दीड ते दोन तास झाडाला घट्ट मिठीत पकडून होतो. जगण्याची सर्व आशा सोडली होती. दीड-दोन तासाने ममदापूर येथील युवक मदतीला धावले आणि आम्ही वाचलो. आई वाहून गेल्याचे समजले. आईला बाहेर  जाण्याचे सांगत होतो; परंतु मुलाच्या प्रेमापोटी तिचा जीव कासावीस होत होता. मुलगा गोठ्यात आहे. त्याला सोडून कसं जायचं यासाठी तिथेच थांबून राहिली आणि ती वाहून गेली.’

पहिल्यापासून गळती

१९९६ मध्ये तलावाच्या कामाला सुरुवात झाली. २००० मध्ये ९८ दलघफू साठा केला जात होता. सुरुवातीपासूनच तलावाला गळती होती. गळती काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली होती. पण दुर्लक्ष झाल्यानेच दुर्घटना घडल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या बहाद्दरांनी वाचविले जीव

श्रीकांत शामराव देसाई, संजय शामराव राणे, प्रवीण नामदेव देसाई, सदाशिव ईश्वरा गुरव, महादेव भैरु भिउंगडे, महादेव पांडुरंग राणे या ममदापूर येथील बहाद्दर तरुणांनी घटनेची माहिती मिळताच तिकडे धाव घेतली आणि या प्रवाहात अडकलेल्या सर्वांचा जीव वाचवला.

loading image
go to top