खासदार संभाजीराजे यांनी घेतली गेहलोत यांची भेट

MP Sambhaji Raje Chhatrapati handed over the demand statement to Union Social Justice Minister Thavarchand Gehlot kolhapur marathi news
MP Sambhaji Raje Chhatrapati handed over the demand statement to Union Social Justice Minister Thavarchand Gehlot kolhapur marathi news

कोल्हापूर  : १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य मागासवर्ग आयोगांना मागास यादीमध्ये एखादा प्रवर्ग समाविष्ट करण्याचा असलेला अधिकार बाधित होत नाही, असे सिलेक्ट कमिटीने स्पष्टपणे नमूद केले आहे. याबाबत केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून, न्यायालयासमोर देखील हे स्पष्ट करावे, या मागणीचे निवेदन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांना आज दिले. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सामाजिक न्याय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचीही संभाजीराजे यांनी दिल्लीत भेट घेतली. 

१०२ व्या घटनादुरुस्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षण सुनावणीमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी संभाजीराजे यांनी गेहलोत यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षण सुनावणीमध्ये सध्या १०२ व्या घटनादुरुस्ती बाबतीत संदिग्धता निर्माण झाली आहे. तसेच, राज्य मागासवर्ग आयोग व राज्य सरकारचे इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याचे अधिकार या घटनादुरुस्ती नंतर अबाधित आहेत की नाही, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याविषयी चर्चा करण्यात आली.

१०२ वी घटनादुरूस्ती होत असताना लोकसभेत ही घटनादुरुस्ती मंजूर झाली. नंतर राज्यसभेमध्ये मंजूर करण्यापूर्वी सिलेक्ट कमिटी नेमली गेली. ज्यामध्ये २५ संसद सदस्यांच्या समितीपुढे हा विषय ठेवण्यात आला. समितीने अहवालात १२ व्या मुद्द्यात ''या घटनादुरूस्तीमुळे राज्य मागासवर्ग आयोगांना मागास यादीमध्ये एखादा प्रवर्ग समाविष्ट करण्याचा असलेला अधिकार बाधित होत नाही,'' असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री गेहलोत यांनी देखील राज्यसभेमध्ये बोलताना याबाबत असणारे राज्यांचे अधिकार काढून घेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेहलोत यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून, न्यायालयापुढे देखील हे स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली. यावर गहलोत यांनी राज्य सरकारचे अधिकार बाधित होत नसल्याचे पुनःश्च एकदा स्पष्ट केले व तसे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या वतीने केले जाईल, असे आश्वस्त केले. दरम्यान, या भेटीमुळे महाराष्ट्रासह आरक्षणावर बाजू मांडण्यास सांगण्यात आलेल्या २६ राज्यांनाही दिलासा मिळणार आहे, असे संभाजीराजे यांनी  सांगितले. या प्रसंगी मराठा संघटनांचे प्रतिनिधी राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव उपस्थित होते. 


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com