esakal | जिद्द असावी तर अशी! चहा दुकान, कॅफे ते जाहिरात कंपनीचा मालक; अभिजीतचा थक्क करणार प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

जिद्द असावी तर अशी! चहा दुकान, कॅफे ते जाहिरात कंपनीचा मालक

जिद्द असावी तर अशी! चहा दुकान, कॅफे ते जाहिरात कंपनीचा मालक

sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापूर : घरची गरिबी, वडिलांचं छत्र हरपलेलं. आई विमल भाजी विकून घर चालवायची; पण काहीतरी शिकून नोकरीला लागावं, असा त्यांचा प्रयत्न होता. विज्ञान शाखेची पदवी घेऊन तो शिवाजी विद्यापीठात (shivaji univercity)आला. स्पर्धा परीक्षेची (Competitive examination)तयारी करू लागला. विविध परीक्षा दिल्या; पण यश मिळेना. शेवटी त्याने व्यवसाय थाटायचं ठरवलं. चहा दुकानानंतर कॅफे ते आता जाहिरात कंपनीचा मालक. ही यशोगाथा आहे, राधानगरीच्या (Radhanagri)अभिजित तानाजी भटाळेची. (Abhijit Bhatale)अपयशाचं दुःख न मानता नव्या जोमाने उभे राहून स्वतःचा व्यवसाय यशस्वी करणारा हा एकेकाळचा स्पर्धा परीक्षार्थी.

रसायनशास्त्र विषयात संशोधन करावं असा त्याचा मानस होता; पण पटकन नोकरी करावी अन् घराला हातभार लावावा यासाठी त्याने २०१७ ला विद्यापीठ गाठलं. होस्टेल, ग्रंथालयात प्रवेश मिळावा म्हणून वृत्तपत्र विद्या विभागात अॅडमिशन घेतलं. सोबतीला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. एम.पी.एस.सी, सरळ सेवेच्या परीक्षा तो देऊ लागला. स्पर्धा परीक्षेतील अनिश्चितता त्याने ओळखली. स्वतःचा व्यवसायच सुरू करण्याची इच्छा आई व भावास सांगितली. त्यांनीही बळ दिलं. राजारामपुरीत त्यानं चहाचं दुकान सुरू केले. ते काही दिवस चालवलं आणि नंतर भावाच्या मदतीने कॅफे सुरू केला. चांगला गल्ला जमा होऊ लागला. गावाकडे आईला तो पैसे पाठवू लागला. व्यवसाय चांगला सुरू असतानाच कोरोनामुळे दुकानाला टाळे लागले. अभिजित गावी परतला. दुकानाचे भाडे तसेच उसनवारीचे पैसे कसे फेडायचे हा प्रश्न होता. शेवटी भावाला सोबत घेऊन उन्हाळ्यात त्याने गावोगावी फिरून कलिंगडे विकली.

सोशल मीडियाचा जमाना आहे, तर जाहिरात कंपनीच का सुरू करू नये, असा विचार मनात आला. विविध ठिकाणी धडपडत माहिती जमवली. विद्यापीठात पत्रकारिता विभागात तो वर्षभर शिकला होता. सोशल मीडियावर तो लेखन करत होता. हाच धागा पकडत त्याने ‘ट्विलाईट ॲड’ ही जाहिरात कंपनी राजारामपुरीत स्थापन केली. तो डिजिटल मार्केटिंगची कामे घेऊ लागला. विद्यापीठातील काही मित्र सोबत घेतले. फेसबुक, इन्स्ट्राग्रामच्या माध्यमातून तो विविध उत्पादनांची जाहिरात करतो. प्रतिमा निर्मिती व जनसंपर्काची कामे घेतो. गोकुळ निवडणुकीत त्याने उमेदवारांच्या जाहिरातीचे काम पाहिले. या माध्यमातून महिन्याला एक ते दीड लाखाची उलाढाल केली. स्पर्धा परीक्षेतल्या अपयशाला मागे टाकत एका कंपनीचा संस्थापक होत अनेकांना रोजगारासोबत प्रेरणा देण्याचं काम तो करतोय.

हेही वाचा- स्पर्धा परीक्षेला राम राम ठोकत शेखरने गाव गाठलं अन् झाला कोट्याधीश

‘कोल्हापुरी कारभार’च्या व्यासपीठावर व्यक्त व्हा

अनेक तरुण विविध समस्यांमुळे नैराश्यग्रस्त होतात. त्यांनी खुलेपणाने व्यक्त व्हावं. त्यांच्या मनातलं ओझं कमी व्हावं या हेतूने त्याने ‘कोल्हापुरी कारभार’ या डिजिटल व्यासपीठाची निर्मिती केली आहे. यावर तरुणांनी व्यक्त होण्याचे आवाहन अभिजित करतो.

हेही वाचा- राणेंना पद; पण शिवसेनेला बळ

एका क्षेत्रात अपयशी ठरलो तर शेकडो संधी खुणावत असतात. त्या ओळखायला हव्यात. तरुणांनी व्यवसायात यावे. संयम, कष्ट, प्रामाणिकपणा ठेवला की, यश मिळतेच.

-अभिजित भटाळे.

loading image