निलंबनाचा धसका? ST ड्रायव्हरचा हृदयविकाराने मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st worker

निलंबनाचा धसका? ST ड्रायव्हरचा हृदयविकाराने मृत्यू

कोल्हापूर : एसटी महामंडळाच्या सावंतवाडी आगारात चालक म्हणून काम करणारे अनिल मारुती कांबळे वय ३८ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मडिलगे ता. भुदरगड येथील घरी निधन झाले. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, या संपातील सहभागी कर्मचाऱ्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. याच्या धसक्याने अनिल यांचा मृत्यू झाल्याचा दावा एसटी कर्मचारी करीत आहेत.

हेही वाचा: हस्ताक्षरावरून पटली ओळख? गडचिरोलीच्या चकमकीत 'ते' चौघे ठार?

एसटी महामंडळाचे राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण करावी या मागणीसाठी दहा दिवस राज्यभरातील अपवाद वगळता सर्वच आगारात मध्ये एसटी कर्मचारी आंदोलन करत असुन, प्रवासी सेवा ठप्प आहे. त्यात एसटी प्रशासनाने जे कर्मचारी संपात सहभागी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यास सुरुवात केली. राज्यभरातील साडेचारशे हून अधिक कर्मचाऱ्यांना या कारवाईला सामोरे जावे लागले.

हेही वाचा: मिलिंद तेलतुंबडे उभारत होता शहरी नक्षलवादाचे जाळे

अनिल कांबळे हे सावंतवाडी येथील आगारात चालक म्हणून काम करतात मात्र संपामुळे ते सध्या घरी होते. निलंबनाच्या कारवाईला आपल्यालाही सामोरे जावे लागणार याची कुणकुण लागताच त्यांना मानसिक धक्का बसला व त्यांनी गेली दोन दिवस अन्न त्याग सुरू केला. यातच त्यांना आज हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यांचे निधन झाले अशी माहिती संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. अनिल यांच्या निधनाचे वृत्त संपकरी एसटी कर्मचारी वर्गाला कळाले त्यानंतर मध्यवर्ती बस स्थानकावरील आंदोलनस्थळी एसटी कर्मचाऱ्यांनी दुःख व्यक्त केले.

संबंधित एसटीचालकाचे एसटी प्रशासनाने निलंबन केलेले नाही. संबंधित चालकाचे निधन मडिलगे येथील राहत्या घरी झाले आहे. मात्र, या मृत्यूचा संदर्भ संप व निलंबनाशी जोडला जात आहे. त्यात तथ्य नाही असे स्पष्टीकरण एसटी महामंडळाच्या मुंबई येथील जनसंपर्क विभागाने रात्री उशिरा समाज माध्यमांवर दिले आहे.

loading image
go to top