esakal | इंजेक्शनअभावी ‘म्युकर’च्या रुग्णाचा मृत्यू; तरुण शाहूवाडी तालुक्यातील
sakal

बोलून बातमी शोधा

इंजेक्शनअभावी ‘म्युकर’च्या रुग्णाचा मृत्यू; तरुण शाहूवाडी तालुक्यातील

इंजेक्शनअभावी ‘म्युकर’च्या रुग्णाचा मृत्यू; तरुण शाहूवाडी तालुक्यातील

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : आरोग्य यंत्रणा व खासगी रुग्णालये यांच्यात समन्वयाचा अभाव, प्रशासनाच्या पातळीवरील टोलवाटोलवी आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन वेळेत न मिळाल्याने शाहूवाडीतील एका तरुणाचा सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. या तरुणाला बेड मिळाला नाही, इंजेक्शन मिळाले नाही. लोकप्रतिनिधीनी शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही सुविधा मिळाल्या नाहीत. त्यासाठी मग नातेवाइकांनी टोकाचा पाठपुरावा केला, तरीही यंत्रणेने अपेक्षित दखल घेतली नाही. त्यातच कोतोली (ता. शाहूवाडी) येथील या ३२ वर्षीय तरुणाला प्राणाला मुकावे लागले. यंत्रणेतील समन्वयाचा अभावच या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप संबंधित तरुणाच्या नातेवाइकांनी पत्राद्वारे केला आहे.

हेही वाचा: शनिवार, रविवार कोल्हापुरात कडक लॉकडाऊन; हे राहणार सुरु, हे बंद

नातेवाइकांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की संबंधित युवकाला कऱ्हाड येथील रुग्णालयात दाखल केले होते. तेथे ‘म्युकर’ची लक्षणे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला उपचारासाठी अन्यत्र घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्याला ‘सीपीआर’मध्ये आणण्यात आले. तेथे बेड शिल्लक नाहीत, असे सांगण्यात आले. तेथून अन्य एका हॉस्पिटलमध्येही जागा नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू झाले. मात्र, इंजेक्शन घेऊन या, असे डॉक्टरांनी नातेवाईकांनाच सांगितले. त्यानुसार नातेवाईक इंजेक्शनसाठी शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात आले. तेथे इंजेक्शन संपल्याचे सांगण्यात आले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले. तेथे इंजक्शनसाठी संबंधित डॉक्टरांकडून ‘ई मेल’ यावा लागतो, असे स्पष्ट करण्यात आले. त्या खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांना ‘ई मेल’ कोणत्या तपशीलाने पाठवायचा, याची नेमकी माहिती नसल्याचेही समोर आले.

दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी अन्न औषध प्रशासनाकडे संपर्क केला. त्यांनीही इंजेक्शनबाबत जिल्हा प्रशासन किंवा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधण्याचे सांगितले. याच काळात तरुणाचा कोरोना अहवालही मिळाला नाही. खासगी रुग्णालयाने हा अहवाल प्रलंबित असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी अखेर लॅबमधून अहवाल मिळविला. मात्र, तेथेही पुन्हा स्वॅब तपासणी करावी लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. याच वेळी ‘सीपीआर’मध्ये इंजक्शन आहेत, अशी माहिती नातेवाईकांना मिळाली. त्यानुसार ‘सीपीआर’मध्ये चौकशी केली असता फक्त तेथे दाखल रुग्णांनाच इंजेक्शन मिळतात, असे यंत्रणेने सांगितले. तेथील एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार रुग्णाला ‘सीपीआर’मध्ये दाखल केले.

दाखल केल्यानंतर उपचार सुरू होण्यास दोन- अडीच तासांची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाला. या सर्व काळात जिल्हा शल्य चिकित्सक, आमदार, खासदार व काही अधिकाऱ्यांमार्फत सतत पाठपुरावा केला. तरीही बेड किंवा इंजेक्शन व उपचारपूर्वक मदत वेळीच मिळू शकली नाही. त्याचा मनस्ताप झाला, अशी माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी या पत्राद्वारे दिली आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नाइट मॅन'!बघण्यासाठी गर्दी

प्रशासन नेमकं करतंय काय?

कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नाहीत. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना आवश्‍यक असलेल्या इंजेक्शनसाठी नातेवाईकांची ससेहोलपट सुरू आहे. अशा प्रयत्नातच एका रुग्णाला जीव गमवावा लागला, अशी परिस्थिती जिल्ह्यात असताना प्रशासन नेमकं करतंय तरी काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर आणि रुग्णसंख्याही फारशी कमी होताना दिसत नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सुरू असल्याचेच या तरुणाच्या मृत्यूवरून स्पष्ट होत आहे. यातून जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, सीपीआर हॉस्पिटल व महापालिका यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येतो. यावर मंत्री, खासदार, आमदार काही बोलणार आहेत की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.