Kolhapur Politics : ऐनवेळी मुश्रीफांनी लोकसभेची उमेदवारी नाकारल्यास पर्याय कोण? 'या' दिग्गजांची नावं चर्चेत!

आजच्या घडीला राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेनेकडेही प्रबळ उमेदवारांची वानवा आहे.
Kolhapur Loksabha Election)
Kolhapur Loksabha Election)esakal
Summary

भाजपकडे ताकदीचा असा उमेदवार नसल्याने विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनाच भाजपात घेऊन उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत (Kolhapur Loksabha Election) सर्वच विरोधी पक्षांची स्थिती ‘करो या मरो’सारखी असणार आहे, त्यातून पक्षाच्या पातळीवर उमेदवार ठरविण्यासाठी बैठका सुरू आहेत.

‘राष्ट्रवादी’च्या मुंबईत (ता. ३०) झालेल्या बैठकीत कोल्हापुरातून माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासाठी आग्रह धरला असला, तरी स्वतः मुश्रीफ यांना मात्र अजूनही राज्याच्या राजकारणात अधिक रस आहे, त्यातून त्यांनी उमेदवारी नाकारल्यास पर्याय कोण? हा राष्ट्रवादीसह ‘महाविकास’ मधील अन्य पक्षांसमोरचा मोठा प्रश्‍न असेल.

आजच्या घडीला राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेनेकडेही प्रबळ उमेदवारांची वानवा आहे. भाजपकडे ताकदीचा असा उमेदवार नसल्याने विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनाच भाजपात घेऊन उमेदवारी देण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत ‘महाविकास’ मध्ये ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाऊ शकते, पण अलिकडेच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्याकडे प्रबळ उमेदवार नसेल तर महाविकासमधील अन्य पक्षांना जागा सोडण्याचे मान्य केले आहे.

त्यातून दुसरा हक्क राष्ट्रवादीचा राहतो, कारण राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून २०१९ पर्यत जिल्ह्यातील या दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. त्यातून श्री. मुश्रीफ यांच्या नावाचा आग्रह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्ष नेतृत्वाकडे काल धरला. श्री. मुश्रीफ यांच्या दृष्टीनेही ही निवडणूक सोपी आहे. कारण, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तर दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

Kolhapur Loksabha Election)
Kolhapur : येत्या तीन महिन्यांत कोल्हापुरात काही तरी घडवलं जाण्याची शंका; सतेज पाटलांनी व्यक्त केली भीती

जिल्ह्याच्या राजकारणात कागल वगळता मुश्रीफ यांनी थेट कोणावर टीका तर नाहीच पण टोकाचे राजकीय वैरही कोणासोबत घेतलेले नाही. त्यांच्यावर झालेली ईडी, सीबीआयची छापेमारी, घोरपडे कारखाना प्रकरणी दाखल झालेला गुन्हा आणि अजूनही या चौकशींचा त्यांच्यामागे असलेला ससेमिरा यात अडथळा ठरू शकतो. त्या जोडीला मुश्रीफ हे अल्पसंख्याक समाजाचे असल्याचा त्यांच्यावर असलेला शिक्काही महत्‍वाचा आहे. त्याबाबत यापूर्वी अतिशय टोकाची टीका होऊन त्यांनी कागलचे मैदान सलग पाचवेळा मारले आहे ही त्यांच्यादृष्टीने जमेची बाजू आहे.

पण त्यातूनही मुश्रीफ यांनी नकार दिलाच तर राष्ट्रवादीलाही ताकदवान उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल. सद्यस्थितीत पक्षाकडे माजी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील पर्यात असू शकतात. यातील व्ही. बी. यांना छत्रपती घराण्याचे पाठबळ मिळू शकते. के. पी.-ए. वाय. यांच्यातील वाद मिटवण्यासाठी एकाला लोकसभेला पाठवण्याचा पर्याय होऊ शकतो.

महाविकास आघाडी एकसंघ राहिल्यास यापैकी कोणीही उमेदवार असेल तर आव्हान निर्माण करू शकतात. पण, पक्षाने मात्र माजी मंत्र्यांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केल्याने श्री. मुश्रीफ यांच्यासमोर पर्याय नसेल. तरीही शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांना ऐनवेळी राष्ट्रवादीत घेऊन त्यांनाही रिंगणात उतरले जाण्याची शक्यता आहे.

श्री. घाटगे यांचे जिल्ह्यातील आणि राज्य पातळीवरील काँग्रेस नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. ते लोकसभेला गेले तर कागल विधानसभेतील मुश्रीफ यांच्या विजयाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. त्यातून मुश्रीफ यांच्याकडूनच घाटगे यांच्या नावाचा आग्रह होण्याची शक्यता आहे. तशी चाचपणीही त्यांनी कालच्या बैठकीत केली. त्याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फारसा प्रतिसाद दिला नसला तरी भविष्यात याच पर्यायावर विचार होण्याची शक्यता आहे.

Kolhapur Loksabha Election)
Kolhapur : ठरलं! लोकसभेसाठी कोल्हापुरातून 'हा' तगडा उमेदवार उतरणार रिंगणात; NCP च्या बैठकीत एकमत

काहीही होऊ शकते

२००९ च्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ने छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी दिल्यावर समोर कोणाचे आव्हानच नसल्यासारखी स्थिती असताना दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ऐनवेळी रिंगणात उतरून मैदान मारले. अशीच स्थिती २०१९ च्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात प्रा. संजय मंडलिक पावणेतीन लाख मतांनी विजयी झाले. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीतही जिल्ह्यातील सद्य राजकीय स्थिती पाहता ऐनवेळी एखादा नवखा उमेदवार ‘महाविकास’ने दिला तर तो आव्हान उभे करू शकेल.

Kolhapur Loksabha Election)
Kolhapur : पराभवाच्या भीतीनं 'त्यांच्या' पायाखालची वाळू सरकलीये; शिवसेना नेत्याचं सतेज पाटलांना जोरदार प्रत्युत्तर

गृहित धरलेले चालत नाही

लोकांना गृहित धरून नेत्यांनी घेतलेला निर्णय जिल्ह्यात चालत नाही, हा इतिहास आहे. यापूर्वी दिवंगत दिलीप देसाई यांनी शिवसेना सोडली, पण नंतर त्यांच्या पत्नींचा पराभव झाला. अशीच स्थिती छत्रपती संभाजीराजे व महाडिक यांच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. त्यामुळे विद्यमान खासदारांनाही ही निवडणूक एवढी सोपी नाही. त्यात राष्ट्रीय पातळीवरील महागाई, बेरोजगारी, शेतीमालाचे पडलेले भाव हे निकालावर प्रभाव टाकू शकणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करूनच सर्वच पक्षांना उमेदवार ठरवावा लागेल.

Kolhapur Loksabha Election)
Nanded : संतोष बांगरांचं आगमन होताच लग्नातही घुमल्या 'पन्नास खोके एकदम ओके'च्या घोषणा, ठाकरे गट पुन्हा आक्रमक

कागल विधानसभेसाठी अंबरिश की नाविद

लोकसभेसाठी हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्‍चित झाल्यास कागल विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून मुश्रीफ यांचे पुत्र नाविद की संजय घाटगे यांचे पुत्र अंबरिश यांना रिंगणात उतरले जाणार याविषयीही उत्सुकता आहे. घराणेशाहीचा आरोप टाळण्यासाठी ऐनवेळी अंबरिश यांनाही रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. लोकसभेचा आघाडीचा उमेदवार कोण? यावरच या घडामोडी अवलंबून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com