esakal | सीईटी परीक्षा केंद्र बदलण्याची संधी हवी 

बोलून बातमी शोधा

सीईटी परीक्षा केंद्र बदलण्याची संधी हवी 

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या बहुतांश भागातून विद्यार्थी आपापल्या गावाकडे परतले आहेत. त्यातच कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे जुलैमध्ये होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी केंद्र बदलण्याची संधी या विद्यार्थ्यांना हवी आहे. विद्यार्थी राहत असलेल्या तालुक्‍यातच परीक्षा केंद्र करावे, अशी मागणी पालकांची आहे. या व्यवस्थेमुळे विद्यार्थी आणि पालकांचा परीक्षेसाठी प्रवासाचा ताण कमी होऊन फिजिकल डिस्टन्स राखणे शक्‍य होणार आहे. 

सीईटी परीक्षा केंद्र बदलण्याची संधी हवी 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या बहुतांश भागातून विद्यार्थी आपापल्या गावाकडे परतले आहेत. त्यातच कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे जुलैमध्ये होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी केंद्र बदलण्याची संधी या विद्यार्थ्यांना हवी आहे. विद्यार्थी राहत असलेल्या तालुक्‍यातच परीक्षा केंद्र करावे, अशी मागणी पालकांची आहे. या व्यवस्थेमुळे विद्यार्थी आणि पालकांचा परीक्षेसाठी प्रवासाचा ताण कमी होऊन फिजिकल डिस्टन्स राखणे शक्‍य होणार आहे. 

राज्यातील एमएचटी-सीईटी परीक्षा 4 जुलैपासून 5 ऑगस्टपर्यंत होणार आहे. गेल्या दोन महिन्यांत असणारी सुटी आणि महाराष्ट्रातील वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे मुंबई, पुणे, लातूर, नांदेड, औरंगाबाद या विभागांतून अनेक विद्यार्थी आपापल्या मूळ गावी परतले. कोल्हापूर, सांगली, सातारासह राज्यभरातील विविध ग्रामीण भागात हे विद्यार्थी आले आहेत. या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयांतून सीईटीसाठी अर्ज केले आहेत. आता मात्र हे विद्यार्थी नाईलाजाने आपापल्या गावी परतले आहेत. 

पुन्हा सीईटी परीक्षेसाठी आपल्या शहरात परतण्याची या विद्यार्थ्यांची सध्या मानसिकता नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी हवी आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा केंद्र बदलण्याची संधी सीईटी सेलने सुरू करावी, अशी पालकांची मागणी आहे. मुख्यत्वे कोव्हिड 19 साथीच्या काळात अनावश्‍यक प्रवास टाळणे शक्‍य होईल. खास करून विद्यार्थी राहात असलेल्या तालुक्‍यातच परीक्षा केंद्राची सोय झाल्यास चांगलेच होणार आहे. यातूनच काही थोड्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि प्रवेश परीक्षा (JEE -MAIN, NATA, NEET) इत्यादी तारखांबाबत गोंधळ झाल्यास अशांना ऑगस्टमध्ये परीक्षेची संधी देण्याची मागणीही पालकांची आहे. 

पालक शिक्षण संघातर्फे मागणी
कोरोनामुळे बहुतांश मोठ्या शहरातून आपापल्या मूळ गावी परतलेल्या विद्यार्थ्यांना ते राहात असलेल्या परिसरात सीईटी परीक्षा केंद्र देण्याबाबत विद्यार्थी आणि पालकांतून मागणी वाढली आहे. याबाबत इचलकरंजी पालक शिक्षण संघातर्फे ई-मेलद्वारे सीईटी सेलकडे मागणी केली आहे. सेलने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. 
- प्रा. अजित पाटील, समुपदेशक, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया, कोल्हापूर.