esakal | इचलकरंजीत स्वतंत्र कोविड तपासणी कक्षाची गरज

बोलून बातमी शोधा

Need For Separate Covid Examination Room In Ichalkaranji Kolhapur Marathi News

कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. याचा ताण आयजीएम रुग्णालयावर आला आहे. अशातच बाह्य रुग्ण कक्षात कोविड व नॉन कोविड रुग्णांची प्राथमिक तपासणी सुरू आहे.

इचलकरंजीत स्वतंत्र कोविड तपासणी कक्षाची गरज

sakal_logo
By
ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. याचा ताण आयजीएम रुग्णालयावर आला आहे. अशातच बाह्य रुग्ण कक्षात कोविड व नॉन कोविड रुग्णांची प्राथमिक तपासणी सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या काळात रुग्णालयात कोविड व नॉन कोविड असे स्वतंत्र तपासणी कक्ष सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा रुग्णांसाठी असणारी ही सोय कोरोनाला अटकाव करण्यासाठी गैरसोय ठरू शकते. आणि कोरोनाचा वाढता आलेख आणखी उंचावला जाण्याची शक्‍यता आहे. 

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आयजीएम रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवरील उपचाराचा प्रश्‍न गंभीर बनला होता. केवळ अत्यावश्‍यक उपचार वगळता कोरोना बाधितांवरच उपचार सुरू होते. सध्या कोरोना संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्याचा सामना आयजीएम रुग्णालयाला करावा लागत आहे. कोरोना प्रसाराची तीव्रता झपाट्याने वाढत असताना सज्ज असणाऱ्या आयजीएममध्ये अद्याप नेटकी यंत्रणा कार्यान्वित होताना दिसत नाही. अतिगंभीर परिस्थितीत रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांच्या आजाराचे निदान होणाऱ्या बाह्य रुग्ण (कॅज्युलिटी) कक्षाची स्थिती बदलणे गरजेचे आहे. कोविड व नॉन कोविड रुग्णांची तपासणी एकाच कक्षात अद्याप सुरू आहे. 

एकाच ठिकाणी होणारी कोरोना सदृश व इतर रुग्णांची तपासणी बाधक ठरणारी आहे. कोविडसाठी स्वतंत्र तपासणी कक्ष आयजीएम रुग्णालयात सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णालयात दैनंदिन अँटिजन व आरटीपीसीआर कोरोना चाचणी सुमारे 150 जणांची होत आहे. इतर रुग्णांची तपासणी व लसीकरणासाठी वर्दळ वाढली आहे. कोविड नॉन कोविड तपासणी कक्षाची स्वतंत्र व्यवस्था आयजीएममध्ये झाली नाही तर कोरोना संसर्ग वाढण्याची भीती कायम आहे. 

तर नॉन कोविडचा प्रश्‍न गंभीर 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत शासनाने आयजीएम रुग्णालय कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित केले. मात्र यावेळी नॉन कोविड रुग्णांवरील उपचाराचा प्रश्‍न गंभीर बनल्याने त्यांची गैरसोय झाली. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढता संसर्ग लक्षात घेऊन आताच आयजीएम रुग्णालयात नॉन कोविडसाठी स्वतंत्र तपासणी कक्ष सुरू करणे फायदेशीर ठरणार आहे. 

सध्या तरी शक्यता नाही
रुग्णालयात जागेची व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. कोरोनासदृश रुग्णांची व नॉन कोविड रुग्णांची तपासणी करावीच लागणार आहे. सध्या स्वतंत्र तपासणी कक्ष सुरू करणे कठीण आहे. 
डॉ. आर. आर. शेटे, 
वैद्यकीय अधीक्षक, आयजीएम 

संपादन - सचिन चराटी

kolhapur