esakal | NH 4 झाला आता "श्रीलंका रोड' : नवा नंबर- AH 47
sakal

बोलून बातमी शोधा

NH 4 is now "Sri Lanka Road": new number - AH47

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग... एन एच- 4... कालपरत्त्वे आणि गरजेनुसार रस्त्याचं रुप बदलत गेलं, पण, त्याच नावं बदललं गेलंय. तो आता "ए एच- 47' झालाय...

NH 4 झाला आता "श्रीलंका रोड' : नवा नंबर- AH 47

sakal_logo
By
दीपक पवार

इटकरे (जि. सांगली) ः पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग... एन एच- 4... कालपरत्त्वे आणि गरजेनुसार रस्त्याचं रुप बदलत गेलं, पण, त्याच नावं बदललं गेलंय. तो आता "ए एच- 47' झालाय... यातील "ए' म्हणजे एशिया... हा रस्ता ग्वाल्हेरहून सुरू झालाय आणि कन्याकुमारीतून तो थेट श्रीलंकेत जावून थांबतोय. त्यामुळे तो आता श्रीलंका रोड बनला आहे... 

देशांतर्गत हा महामार्ग एन एच- 48 म्हणून ओखळला जाणार आहे. तो सातारा, सांगली, कोल्हापूरहून जिल्ह्यांतून जातोय, ही आपल्यासाठी विशेष अभिमानाची बाब. मग आपला "एन एच- 4' कुठे गेला? तो थेट पोहचला अंदमानला... तिथल्या एका राष्ट्रीय महामार्गाला हा क्रमांक दिलाय गेलाय, जो पश्‍चिम महाराष्ट्राच्या मुखात बसला होता. हा बदल झाल्याने तांत्रिकदृष्ट्या तुमच्या-आमच्या जीवनमानात फार फरक पडणार नाही, पण भावनिकदृष्ट्या "एन एच 4' हा मनाच्या कोपऱ्यात नेहमीच घर करून राहणार हे नक्की. 

पुणे-बंगळूर महामार्ग अनेक दशकांचा साथीदार आहे. पश्‍चिम महाराष्ट्राला मुंबईशी आणि इकडे कर्नाटकात बंगळूरशी... अर्थात दोन बड्या राज्यांच्या राजधानीशी जोडणारा हा महामार्ग. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा महामार्ग येथील स्थानिकांचा बहात्तर वर्षांपासूनचा सोबती, प्रगतीचा आधार राहिलाय. त्यावर "राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4' किंवा "NH 4' ही पाटी लक्ष वेधून घ्यायची. ती आपल्या भागाची ओळखही झाली. "कुठे आहात?' या प्रश्‍नावर लोक उत्तर देताना गावाच उल्लेख करायचे नाहीत, "एन एच- 4'वर आहे म्हणून सांगायचे. पश्‍चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला तो नंबर माहिती होता. 

आता हा राष्ट्रीय महामार्ग आंतरराष्ट्रीय झालाय, आशिया मार्ग झालाय. एका खंडातील दोन देशांना तो जोडतोय. ग्वाल्हेर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, बंगळुरू आणि पुढे कन्याकुमारीतून श्रीलंका असा तो जोडला गेलाय. आता या रस्त्यावरून जाताना कुणी मोबाईलवर विचारलं, "कुठल्या रोडला आहेस?' तर तुम्ही बिनधास्तपणे "श्रीलंका रोड', असे सांगू शकता. हा रस्ता आपल्या भागातून जातोय, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. कारण, हा मूळ रस्ता झाला तेव्हा इथला माणूस त्यासाठी खपलाय, खूप राबलाय. बैलगाडीने दगड ओढलेत. इथल्या माणसांनीच दगड फोडलेत. या रस्त्याने रोजगार दिलाय आणि जगण्याला वेगही. जमिनींचा भाव तर गगनाला भिडलाय तो या रस्त्यामुळेच. यामुळे मुलाला स्थळ शोधणारा पिता मिशीला पिळ देत "एन एच- 4'ला लागून जमीन हाय आपली', असे रुबाबात सांगायचो... या रुबाबात आता आणखी भर पडेल! 

एन एच 4 गेला अंदमानला... 
आता आपला एन एच-4 आता अंदमान-निकोबार बेटावर पोहचलाय. अर्थात, तिथल्या एका रस्त्याला हा क्रमांक दिला गेलाय. हा 230 किलोमीटरचा रस्ता असून पोर्ट ब्लेअरवरून जातो. "द ग्रेट अंदमान ट्रंक रोड' या नावाने तो ओळखला जातो. पूर्वी तो एन एच-223 नावाने ओळखला जात होता. स्वातंत्र्य लढ्यातील योद्‌ध्यांना इंग्रज सरकार काळ्या पाण्याच्या शिक्षा द्यायला अंदमानला नेत असे. 

आशिया खंडातील भारतातील महामार्ग 

  • आशिया महामार्ग 1- इराण, पाकिस्तान, दिल्ली, कलकत्ता, बांगलादेश, व्हिएतनाम, चीन, जपान 
  • क्र. 2 - दिल्ली ते नेपाळ 
  • क्र. 43 - आग्रा, नागपूर, हैद्राबाद, बंगळूर ते श्रीलंका 
  • क्र. 45 - चेन्नई, कलकत्ता ते बांगलादेश 
  • क्र. 46 - धुळे, नागपूर, कलकत्ता, बांगलादेश 
  • क्र. 47 - ग्वाल्हेर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, बंगळूर, श्रीलंका  

संपादन : युवराज यादव 

loading image