esakal | ग्रेस गुणात तिसऱ्या नियमाचा अडथळा

बोलून बातमी शोधा

 Obstacle to the third rule in Grace points

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावी व बारावीतील खेळाडूंना ग्रेस गुण दिले जाणार असून, जिल्हा क्रीडा कार्यालय सुधारित परिपत्रकाच्या (जीआर) प्रतीक्षेत आहे. दहावीपूर्वी खेळाडूने प्रावीण्य मिळविले असले तरी ग्रेस गुणांसाठी त्याला दहावीत असताना क्रीडा प्रकारात सहभागी होणे आवश्‍यक आहे,

ग्रेस गुणात तिसऱ्या नियमाचा अडथळा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावी व बारावीतील खेळाडूंना ग्रेस गुण दिले जाणार असून, जिल्हा क्रीडा कार्यालय सुधारित परिपत्रकाच्या (जीआर) प्रतीक्षेत आहे. दहावीपूर्वी खेळाडूने प्रावीण्य मिळविले असले तरी ग्रेस गुणांसाठी त्याला दहावीत असताना क्रीडा प्रकारात सहभागी होणे आवश्‍यक आहे, या निकषामुळे प्रस्ताव मागवायचे कसे, असा प्रश्‍न क्रीडा कार्यालयासमोर आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 26 फेब्रुवारीला ग्रेस गुणांचे प्रस्ताव पाठविण्याबाबतचे पत्र पाठविले आहे. ते प्रस्ताव 30 एप्रिलपर्यंत पाठविणे बंधनकारक आहे. 


दहावी व बारावीतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या व प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासन निर्णयानुसार ग्रेस गुण दिले जातात. गतवर्षी कोरोनामुळे शालेय क्रीडा स्पर्धां झाल्या नाहीत. विविध क्रीडा संघटनांच्या स्पर्धांनाही ब्रेक लागला. त्यांचे शालेय नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने दहावी व बारावीतील खेळाडूंना ग्रेस गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित खेळाडूंनी त्यांनी तत्पूर्वीचे प्रमाणपत्र क्रीडा कार्यालयाला सादर करणे आवश्‍यक आहे. मात्र, शासनाच्या 20 डिसेंबर 2018च्या परिपत्रकातील तिसऱ्या नियमात संबंधित खेळाडूने दहावीत असताना खेळणे आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे. हाच नियम दहावी व बारावीतील खेळाडूंना ग्रेस गुण देण्यात अडथळा ठरत आहे. 

गतवर्षी स्पर्धाच झाल्या नसल्याने दहावीतील खेळाडूंना त्याचे प्रमाणपत्र देता येणार नाही, ही वस्तूस्थिती आहे. क्रीडा कार्यालय सुधारित परिपत्रक कधी येते, याच्या प्रतीक्षेत आहे. खेळाडूंची अडचण लक्षात घेत क्रीडा कार्यालयाने शासनाला पत्र पाठवून तिसऱ्या नियमातील बदलाबाबत कळविले आहे. प्रस्तावासाठी आवाहन केल्यानंतर क्रीडा शिक्षक खेळाडूंचे प्रस्ताव क्रीडा कार्यालयाकडे येतात. त्यांची छाननी होऊन ते राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठविले जातात. त्रुटी आढळल्यास ते प्रस्ताव मंडळाकडून पुन्हा कार्यालयाकडे पूर्ततेसाठी पाठविले जातात. ही प्रक्रिया लक्षात घेता सुधारित परिपत्रक लवकर येणे अपेक्षित आहे. 


राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आलेले पत्र क्रीडा संचालनालयाला पाठविले आहे. त्यांच्या गाईडलाईन्स आल्या की, खेळाडूंना ग्रेस गुणांसाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत आवाहन केले जाईल. 
- डॉ. चंद्रशेखर साखरे,
जिल्हा क्रीडाधिकारी.