शंभरला शंभर पॉइंट: वेबसाईटचा आधार घेत क्रिकेट, पत्त्याचा अंदर बहार

online Gambling crime case kolhapur
online Gambling crime case kolhapur

कोल्हापूर : ऑनलाईन १०० रुपये भरले की मिळणाऱ्या १०० पॉइंटद्वारे क्रिकेट, पत्त्याचा ऑनलाईन जुगाराचा डाव पेटतो. वेबसाईटच्या माध्यमातून मोबाईलवरूच हा जुगार खेळला जातो. संबंधितांपुरता मर्यादित जुगाराचा नवा प्रकार पोलिसांच्याच कारवाईतून पुढे आला. जागा निश्‍चितीअभावी चित्रात न येणारे असे जुगार अड्डे शोधून त्यावर कारवाई करण्याचे नवे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.


एखाद्या खोलीत, अगर मोकळ्या जागेत पत्त्याचा जुगार खेळणाऱ्यांवरील किंवा टीव्हीवर मॅच बघत मोबाईलच्या माध्यमातून क्रिकेट बेटिंग घेणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई आता नवी राहिलेली नाही. यादवनगरातील मटका अड्ड्यावर एप्रिल २०१९ मध्ये पोलिसांनी छापा टाकला. त्याला मटका मालकाच्या साथीदारांनी विरोध करत पोलिसांवर प्रतिहल्ला केला. त्यानंतर संबंधित मटका मालकासह त्याच्या ४२ साथीदारांवर तत्कालिन शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी थेट मोकाअंतर्गत कारवाई केली. मटका, जुगार अड्डेचालकांवरील पोलिसांकडून घेण्यात आलेल्या आक्रमक धोरणाने जिल्ह्यातील काळे धंदेवाले थंड होते; पण तत्कालिन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची बदली झाल्यानंतर पुन्हा त्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे; पण चित्रात न येता जुगार अड्डे चालविण्याचा काळेधंदेवाल्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे. 


शाहूपुरीत पोलिसांनी केलेल्या कारवाईतून ऑनलाईन जुगार अड्ड्याचे वास्तव समोर आले. एका वेबसाईटचा आधार घेत क्रिकेट, पत्त्याचा अंदर बहार, तीन पानी जुगार खेळला जात होता. जुगार खेळणाऱ्याकडून ऑनलाईन पैसे स्वीकारायचे. शंभर रुपयाच्या बदल्यात त्याला संबंधित वेबसाईट डाउनलोड करायला लावायची. त्यावर शंभर पॉईंट द्यायचे. त्या पॉईंटच्या आधारे हा जुगार खेळला जात होता. इतकेच नव्हे, तर अड्डा चालकाने व त्याच्या हस्तकांनी जुगार खेळणाऱ्यांना कमीत कमी पैसे लागावेत, यासाठी साईटमध्ये फेरफारही करून फसवणुकीचाही प्रकार केल्याचा प्रकार तपासात येऊ लागला आहे. केवळ मोबाईलवर खेळला जाणाऱ्या जुगारात तरुणाई अडकण्याचे धोके निर्माण झाले आहेत. असे ऑनलाईन जुगार अड्डे वेळीच शोधून त्यावर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांतून केली 
जात आहे. 

कारवाईतील अडचणी...
संपर्कातील आणि ओळखीच्यांनाच या जुगारात ओढायचे. त्यांच्याकडून मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे घेऊन त्या पटीत पॉईंटच्या रूपाने त्यांना जुगार खेळण्याची मुभा द्यायची. पेमेंटही ऑनलाईनच करायचे, असा नवा चित्रात न येणारा जुगाराचा प्रकार पुढे येत आहे. तक्रारींअभावी असे अड्डे शोधण्यात अडचणी येत आहेत.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com